लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने तिच्या प्रियकराला तुफान मारहाण केली आहे. या मारहाणीत तो जबर जखमी झाला असून त्याला तब्बल १३ फ्रॅक्चर झाले आहेत. गेल्या १७ दिवसांपासून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात हा धक्कादाय प्रकार घडला आहे.

प्रेयसीने प्रियकराकडून २१.५ लाख रुपये घेतले होते. हे पैसे परत करण्याच्या बहाण्याने प्रेयसीने त्याला घरी बोलावले. पण तो घरी येताच तिच्या घरातील सदस्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा दावा त्याने केला आहे. तसंच, महिलेने लग्न करण्याची मागणी केली. परंतु, त्याने लग्नाला नकार दिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी जबर होती की त्याचे दोन्ही हात-पायांना फ्रॅक्चर झालं आहे. सध्या त्याच्यावर फरीदाबादमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे.

दोघांचाही घटस्फोट झालेला नाही

धक्कादायक म्हणजे या दोघांचंही हे विवाहबाह्य नातं आहे. दोघांचाही त्यांच्या खऱ्या जोडीदारापासून घटस्फोट झालेला नाही. असं असतानाही हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. संबंधित महिला या तरुणाच्या मोबाईल दुकानात जायची. तेव्हापासून म्हणजेच २०१९ पासून या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. या दोघांचेही त्यांच्या मूळ जोडीदाराकडून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.

नवभारत टाईम्समधील एका वृत्तानुसार, महिलेला १० वर्षांची मुलगी आहे तर तिच्या प्रियकराला तीन मुले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.