Buying Videos Of Women Bathing At Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधि भाविकांनी अमृतस्नान केले आहे. तसंच, आता हा महाकुंभमेळा संपत आलेला असताना इथे गर्दीही वाढत जातेय. मात्र, येथील अत्यंत धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. महाकुंभणेळ्यात स्नान करणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढून ते विकले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आतापर्यंत १०३ सोशल मिडिया अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ खरेदी करणाऱ्यांना आणि असे व्हिडिओ विकणाऱ्यांना अटक केली जाईल, असे महाकुंभाचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) वैभव कृष्णा यांनी एनडीटीव्हीला सांगितले. काही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या मिहलांचे व्हिडिओ अपलोड केले जात असल्याचं यूपी सोशल मीडिया मॉनिटरिंग टीमला आढळून आलं आहे.

व्हिडिओ विकण्यासाठी काही सोशल मीडिया ग्रुप्स तयार

“काल आम्हाला कळले की काही सोशल मीडिया प्रोफाइल आहेत, काही गट तयार झाले आहेत जिथे अशी बेकायदा कृत्ये केली जात आहेत. आम्ही त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि अशा गैरकृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांची ओळख पटवली जात आहे. हे गुन्हेगारी कृत्ये आहेत. आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा आहे”, महाकुंभाचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) वैभव कृष्णा यांनी सांगितले.

सोशल मीडिया प्रोफाईलवर होणार कारवाई

“असे व्हिडिओ विकणाऱ्यांना आणि ते खरेदी करणाऱ्यांनाही अटक केली जाईल. आमची सोशल मीडिया टीम सतत देखरेख करत आहे. अशा प्रकारची सामग्री अपलोड करणाऱ्या सोशल मीडिया प्रोफाइलवर कारवाई केली जाईल”, असे अधिकाऱ्याने अधोरेखित केले.

टेलिग्रा आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओंची विक्री

आतापर्यंत असे किती गट किंवा लोक ओळखले गेले आहेत असे विचारले असता, वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “काही टेलिग्राम आणि इंस्टाग्राम प्रोफाइलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आम्ही काल एफआयआर दाखल केला. टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामवर काही प्रोफाइल आहेत ज्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आताही आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवत आहोत. आम्ही त्यांची ओळख पटवत आहोत आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करत आहोत. आतापर्यंत १०३ सोशल मीडिया प्रोफाइल ओळखले गेले आहेत, ज्यामध्ये दहशत पसरवणारे प्रोफाइल आहेत आणि असेही प्रोफाइल आहेत जे महाकुंभातील महिलांचे खाजगी व्हिडिओ पोस्ट करत आहेत”, असे अधिकाऱ्याने सांगितले.

“एकूण २६ सोशल मीडिया हँडल आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल”, असे ते म्हणाले.

Story img Loader