Crime News From Gujarat : गुजरातच्या ग्रामीण अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडची तिच्या वडील आणि भावाने निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी भावाला अटक केली असून वडील फरार आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
रविवारी, एका कार्यक्रमात शांतुभा आणि रीना एकमेकांकडे पाहत आणि हसत असल्याचे पाहून रीनाचा भाऊ विशालसिंह विक्रमसिंह सोलंकी आणि त्याचे वडील विक्रमसिंह सरदारसिंह सोलंकी यांना राग अनावर झाला. परिणामी त्यांनी शांतुभा झनुभा सोलंकी (२९) याची चाकूने वार करून हत्या केली.
लग्नाआधी दोघांचेही प्रेमसंबंध
देत्रोज तालुक्यातील भाट वासना गावात एका सामुदायिक कार्यक्रमानंतर ही घटना घडली. दोन्ही आरोपींनी खून करण्यासाठी मोठ्या चाकूचा वापर केला, असे देत्रोजचे निरीक्षक एस.ए. गढवी यांनी सांगितले. साणंदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) नीलम गोस्वामी म्हणाल्या, “महिला आणि मृतक सुमारे सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते, परंतु कुटुंबाने ते गुप्त ठेवले आणि चार वर्षांपूर्वी महिलेचे दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिले.” विशेष म्हणजे, शांतुभाचेही लग्न दुसऱ्या गावातील महिलेशी झाले होते.
पोलिसांच्या निवेदनानुसार, कुटुंबाने रीनाला शांतुभाशी फोनवर बोलताना ऐकले होते. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, शांतुभा आणि महिलेच्या भावामध्ये भांडण झाले. या भांडणात शांतुभा गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे निवेदनात म्हटले आहे.