हरियाणातील फरीबादमध्ये गृहकाम करणाऱ्या एका महिलेवर अमानुष बलात्कार करण्यात आला आहे. बसचालकाने बसमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे बसचालकाच्या या गुन्ह्यात त्याला बसवाहकानेही मदत केली. त्यामुळे याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
फरीदाबादमध्ये अनेक घरांमध्ये गृहकाम करणारी ५६ वर्षीय महिला सायंकाळी सहाच्या सुमारास सेक्टर १७ बायपास रस्त्यावर सेक्टर ५६ मध्ये घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. तिच्यासमोर एक पांढऱ्या रंगाची बस थांबली आणि ड्रायव्हरने तिला तिच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिलं. त्यामुळे ती त्या बसमध्ये चढली. पण त्या बसमध्ये एकटीच असल्याचं तिला जाणावलं. जेव्हा तिने कंटरक्टरला याबाबत विचारलं तेव्हा तिला सांगण्यात आलं की पुढच्या स्थानकावर प्रवासी चढतील.
दरम्यान, गाडी पुढे गेल्यावर चालकाने एका निर्जन ठिकाणी बस थांबवली. त्यामुळे ती घाबरली. या काळात बस वाहकाने बसच्या सर्व खिडक्या बंद केल्या. त्यानंतर ड्रायव्हरने तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू केले. या दरम्यान बसवाहक तिथेच इतरांवर लक्ष द्यायला थांबला होता, अशी माहिती फरीदाबादचे पोलीस अधीक्षक यशपाल यांनी सांगितलं.
महिलेने पोलिसांत केली तक्रार
या घटनेनंतर बसचालकाने महिलेला सेक्टर १७ येथे सोडले आणि याबाबत कोणाला काही सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. बसच्या बाहेर येताच तिने थेट पोलीस ठाणे गाठले. तिने तिच्यावर घडलेला अपप्रसंग पोलिसांना सांगितला. त्याअंतर्गत पोलिसांनी सेक्टर १७ पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम ६४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. सेक्टर १६ मधील महिला पोलीस ठाण्याने पोलीस तपास सुरू केला असून गुन्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जाणार आहेत.
प्राथमिक तपासातून असं स्पष्ट झालंय की बस शेजारच्या गुडगावमधील एका खासगी कंपनीच्या कामगारांना घेऊन जात होती. तर, बसचालक रोशन लाल (३५) आणि कंडक्टर नान्हे यांनाही अटक करण्यात आली आहे. रोशन हा जयपूरमधील पनियाला गावचा रहिवासी असून नान्हे उत्तर प्रदेशातील बदायूंमधील हरदट्टपूर गावचा रहिवासी आहे.