Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पत्नीने पतीची केलेली क्रूर हत्या चर्चेत असतानाच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. पत्नीचं विवाहबाह्य संबंध कळल्यानंतर पोलीस असलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकराची आणि त्याच्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
प्रियकरासह त्याच्या मित्राची हत्या
पत्नीचे बाहेर विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या महेंद्र कुमारला कळले. त्याने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकराला भेटायला बोलावण्यास सांगितले. तिने त्यानुसार तिचा प्रियकर मनोजला फोन करून भेटायला बोलावले. तो भेटायला येताच महेंद्र कुमारने त्याच्यावर हल्ला केला. जवळपास २० वेळा त्याच्यावर वार केले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. महेंद्र कुमार एवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्याचा मित्र रोहित लोधी याचीही हत्या केली.
पोलिसांना शुक्रवारी रात्री लखीमपूरच्या नागवा पुलाजवळ दोन्ही मृतांचे मृतदेह आढळले. पोलिस तपासात असे दिसून आले की कॉन्स्टेबलने हत्येची योजना आखली होती. त्याने त्याच्या पत्नीला मनोजला भेटायला बोलावण्यास भाग पाडले आणि तिथेच त्याची हत्या केली.
पत्नीची बोटं कापली गेली
मनोजवर १८-२० वार झाले असून रोहितच्या मानेवर एकदाच वार करण्यात आला होता. हल्ल्यादरम्यान, या झटापटीत पत्नीने मध्ये पडून प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर हल्ला झाला. त्यामुळे ती जखमी झाली असून तिची बोटं कापली गेली आहेत.
हत्येनंतर कॉन्स्टेबल लखीमपूरला पळून गेला. तथापि, पोलिसांनी त्याचे मोबाईल रेकॉर्ड ट्रॅक केले आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्या पत्नीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर दोघांनीही घटनेत आपला सहभाग असल्याचे कबूल केले. पोलिस आता या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत.