Crime News Prayagraj Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता एका व्यक्तीने या गर्दीचा गुन्हा करण्यासाठी वापर करून घेतला आहे. प्रयागराज येथील एका हॉटेलमध्ये पत्नीची हत्या करून ती महाकुंभमेळ्यात हरवली असल्याचा बनाव त्याने रचला. पण मुलाने यावर विश्वास न ठेवता शोधमोहिम सुरू केल्याने त्याला त्यांच्या पित्याचं खरं रुप समजलं. इंडिया टुडेने यांसदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीत राहणारे अशोक वाल्मिकी आणि त्याची पत्नी मिनाक्षी वाल्मिकी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी गेले होते. त्यांनी त्रिवेणी संगमात फोटो काढून सोशल मीडियावर अपलोडही केले. त्यानंतर हे जोडपे एका लॉजमध्ये गेले आणि त्याने पत्नीला आश्वासन दिले की दुसऱ्या दिवशी ते पवित्र स्नान करण्यासाठी जातील. पण दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडण्याआधीच अशोकने मिनाक्षीची हत्या केली. वॉशरुममध्ये धारदार शस्त्राने हत्या करून तो खोलीतून निघून गेला. त्यानंतर त्याने मुलाला फोन करून सांगितलं की त्यांची आई महाकुंभमेळ्यातील गर्दीत हरवली.

दरम्यान, इथे पोलिसांना लॉजमध्ये या महिलेचा मृतदेह सापडला. या मृतदेहाचा छडा लावण्याकरता पोलिसांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. कारण, या लॉज मालकाने या जोडप्याकडून कोणतंही ओळखपत्र घेतलं नव्हतं. तसंच, अवघ्या ५०० रुपयात या लॉजमधील रुम देऊ केली होती. ओळखपत्राशिवाय आरोपीपर्यंत पोहोचणं पोलिसांसमोर आव्हान होतं.

पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

दुसरीकडे आईच्या शोधासाठी तिचा मुलगा प्रयागराजच्या दिशेने निघाला. महाकुंभमेळ्यात आल्यानंतर त्याने तिथे आईची शोधाशोध केली. हरवलेल्या आईला शोधण्यासाठी त्याने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांना आईचा फोटो दाखवल्यानंतर त्याने या मुलाला प्रयागराजमधील शवागरात नेले. तिथे त्याने त्याच्या आईचा मृतदेह ओळखला. याच काळात पोलिसांनी त्याच्या वडिलांना फोन करायला लावला. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी अशोक वाल्मिकीला शोधून काढले.

अशोकने पत्नीची हत्या का केली?

अशोकचे बाहेर प्रेमसंबंध होते. यावरून या दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. यामुळे अशोक कंटाळला होता. म्हणून त्याने पत्नीचा काटा काढला, असा जबाब त्याने पोलिसांना दिला. या गुन्ह्यात अडकू नये म्हणून त्याने मुद्दाम ओळखपत्र विचारणार नाहीत, असा लॉज शोधून काढला होता.