अमेरिकेत पदव्यूत्तर पदवीचं शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय तरुणीचा हिट अँड रन अपघातात मृत्यू झाला आहे. ती मुळची आंध्र प्रदेशच्या गुंटूर येथील रहिवासी आहे. मे महिन्यात तिचं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण होणार होतं. परंतु, त्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला. हिंदूस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दीप्तीचा मृत्यू टेक्सासच्या डेंटनमध्ये झालेल्या अपघतात झाला. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी असलेली २४ वर्षीय विद्यार्थी १२ एप्रिल रोजी कॅरिल अल लागो ड्राइव्हच्या २३०० ब्लॉकजवळ मैत्रिणीबरोबर घरी चालत जात होती. तेवढ्यात एका वेगवान वाहनाने त्यांना धडक दिली आणि तेथून वाहनचालक पळून गेला.

मैत्रीणीवर उपचार सुरू

या अपघातात दीप्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर उपचार सुरू असताना १५ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तर तिच्या मैत्रिणीवर उपचार सुरू असून शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबीयांनी पीटीआयला सांगितलं.

कॉनव्होकेशन सोहळ्याआधीच मृत्यूने कवटाळलं

दीप्ती नॉर्थ टेक्सास विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती आणि मे महिन्यात पदवीधर होणार होती. दीप्तीच्या पदव्यूत्तर निकालानंतर तिचे पालक तिचा कॉनव्होकेशन सोहळा पाहण्याकरता अमेरिकेला जाणार होते. पण त्याआधीच त्यांच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं.

“मी तिच्याशी अधूनमधून बोलायचो. तिला त्यादिवशी कॉलेजला जाण्याची घाई होती. त्यामुळे ती आमच्याशी फार बोलली नाही. वेळ मिळाल्यावर रविवारी फोन करते असं सांगून तिने फोन ठेवला. ते बोलणं आमच्यासाठी शेवटचं ठरलं”, असं तिचे वडील हनुमंत राव म्हणाले. दीप्तीच्या कुटुंबाने सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी खूप त्याग केले आणि तिला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवण्यासाठी त्यांची शेतीही विकली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, कुटुंब आता तिचे पार्थिव भारतात येण्याची वाट पाहत आहेत. सोमवारी पार्थिव हैदराबाद येथे येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील तेलुगू संघटना आवश्यक औपचारिकता आणि व्यवस्थांचे समन्वय साधण्यास मदत करत आहेत. नरसारावपेट अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक पदवीधर असलेल्या दीप्तीला नेहमीच परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण ही इच्छा पूर्ण होण्याआधीच मृत्यूने तिला कवटाळलं.