Prasanna Shankar and Dhivya Shashidhar : मूळ भारतीय असलेले आणि अब्जावधी डॉलर्सच्या कंपनीचे सहसंस्थापक प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्या पत्नीवर आणि पोलिसांवर छळाचा आरोप केला आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असून तिने त्यांच्या मुलाला अमेरिकेत लपवून ठेवल्याचा दावा प्रसन्ना यांनी केलाय. तर, हे आरोप त्यांची पत्नी दिव्या यांनी फेटाळून लावला असून तिने यासंदर्भात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. हे संपूर्ण प्रकरण प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून शेअर केला आहे.

प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्यावर ओढावलेल्या आपबितीची कहाणी एक्सवर शेअर केली आहे. त्या ते म्हणाले, माझं नाव प्रसन्न असून मी रिपलिंग या कंपनीची स्थापना केलीय. मी माझ्या पत्नीपासून घटस्फोट घेतोय. मी सध्या चेन्नई पोलिसांच्या कारवाईपासून पळत असून सध्या तामिळनाडूच्या बाहेर आहे.”

मी एक क्रमांकाचा कोडर होतो

“ही माझी कहाणी आहे”, असं म्हणत ते पुढे म्हणाले, “माझा जन्म चेन्नईत झाला. जवळपास २० वर्षे येथे राहिलो. मी एनआयटी ट्रिची येथे शिकलो असून तिथेच माझी ओळख एका मुलीशी झाली. तिच्याशी मी लग्न केलं. मी भारतातील एक क्रमांकाचा कोडर होतो. तंत्रज्ञानसंबंधित कपंनी सुरू करण्याकरता मी अमेरिकेत स्थायिक झालो.”

“माझ्या आणि दिव्याच्या लग्नाला १० वर्षे झाले असून आम्हाला ९ वर्षांचा मुलगा आहे. तिचे विवाह्यसंबंध असल्याचं कळल्यानंतर आमच्यात वाद सुरू झाले. अनुप नावाच्या एका व्यक्तीबरोबर गेली सहा महिने तिचे विवाहबाह्य संबंध आहेत”, असा दावा प्रसन्ना शंकर यांनी केला आहे. प्रसन्नाने हे आरोप करताना बायको आणि तिच्या कथित प्रियकराबरोबरचे चॅट्स आणि हॉटेल्सचे बुकिंगही शेअर केले आहेत.

“आमच्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मी तिला किती रुपये देणं अपेक्षित आहे यावरही आम्ही चर्चा आहे. पण ती त्यावर नाराज होती. त्यामुळे तिने माझ्यावर छळाचा आरोप करून माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली”, असं प्रसन्ना म्हणाले. ते पुढे म्हणाले, “त्यानंतर तिने माझ्यावर बलात्काराचा आरोप केला. मी तिचे खासगी फोटो व्हायरल केल्याचाही आरोप तिने केला. सिंगापूर पोलिसांनी याप्रकरणी चौकशीही केली. परंतु, त्यांना यात काहीही तथ्य आढळलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मी भारतात घटसफोटासाठी अर्ज केला अन् तिने अमेरिकेत

“मी भारतात घटस्फोटासाठी अर्ज केला. पण तिने अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज केला. जेणेकरून तिला अधिक पैसे मिळू शकतील, असा दावा प्रसन्ना यांनी केलाय. त्यानंतर तिने माझ्या मुलाचं अपहण करून अमेरिकेत नेलं. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय बाल अपहरण प्रकरण अमेरिकेत दाखल केलं. त्यानंतर अमेरिकेतली न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला आणि मुलाचा ताबा माझ्याकडे दिला, असं प्रसन्ना म्हणाले.

तिने सिंगापूरमध्येही कायद्याचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळे तिने माझ्या चर्चा करून हे प्रकरण थांबवण्याकरता चेन्नईत आली. तिथेच तिला स्थायिक व्हायचं होतं. त्यामुळे त्यानुसार आम्ही आमच्यात सामंजस्य करारकेला. त्यानुसार मी तिला ९ कोटी रुपये आणि दर महिन्या ४.३ लाख प्रत्येक महिन्याला देऊ करण्याचे मान्य केले. त्यानुसार, मी माझ्या मुलाचे आणि तिचे फ्लाइटचे तिकिट बुक केले. सामंजस्य करारानुसार मुलाचा ताबा आम्हा दोघांकडे ५०-५० टक्के राहील असा होता. पण त्यानुसार माझ्याकडे मुलगा फार कमी वेळ राहिला, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

“करारानुसार मुलाचा पासपोर्ट एका कॉमन लॉकरमध्ये ठेवण्याचं ठरलं होतं. पण तिने ते मान्य केलं नाही. सामंजस्य करार वैध नसल्याचा दावा केलाय. त्यामुळे अधिक पैसे मिळवण्यासाठी ती पुन्हा अमेरिकेत घटस्फोटाचा अर्ज करण्याकरता जाण्याची शक्यता आहे”, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न

“याप्रकरणी मी अखेर कोर्टात गेलो. मुलाचा पासपोर्ट लॉकरमध्ये ठेवणार असेल तरच मी माझ्या मुलाचा ताबा देईन, असं मी कोर्टाला सांगितलं. पण तिने कोर्टाच्या तारखांना हजेरी लावली नाही. त्याव्यतिरिक्त ती माझ्या हॉटेलच्या बाहेर माझ्या मुलाला भेटायला आली होती. ती तिथून मुलाला पळवून घेऊन जाणार होती, पण मी ते थांबवण्यात यशस्वी झालो”, असंही ते म्हणाले. “त्यामुळे तिने पोलिसांना फोन करून मुलाच्या अपहरणाची खोटी तक्रार केली. त्यानुसार पोलीस मध्यरात्री माझ्या घरी आले. पण त्यापूर्वीच मी माझ्या मुलाला तिथून घेऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर मी पोलिसांना माझ्या वकिलामार्फत माझी कहाणी सांगितली. तसंच, मुलगा माझ्याबरोबर आनंदी असल्याचंही दाखवलं. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पोलीसही यात फार काही करू शकले नाहीत”, असं त्यांनी सांगितलं.

मित्राला मध्ये ओढलं अन्…

तरीही पोलीस माझं लोकेशन ट्रॅक करत होते. त्यांनी माझ्या आईच्या घराची नासधूस केली आणि मलाही बोलावून घेतलं. त्यांनी माझ्या मित्राला गोकुळला ओलीस ठेवलं. जर त्याने मला भेटायला बोलावलं नाही तर मुलाच्या अपहरणात त्याचा हातभार होता असा खोटा आरोप त्याच्यावर लावण्यात येणार होता, असंही त्याने पोस्टमध्ये म्हटलंय.

“या त्रासामुळे गोकूळ बंगळुरूला निघून गेला. हे प्रकरण नवरा बायकोमधलं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. परंतु, साध्या वेशातील पोलिसांनी त्याला बंगळुरूतही ताब्यात घेतलं. ताब्यात घेताना पोलिसांकडे कोणतेही कागदपत्र किंवा नोटीस नव्हती. पोलिसांनी त्याला चेन्नईला आणलं. गेल्या तीन दिवसांपासून कोणत्याही एफआयआरशिवाय पोलिसांच्या ताब्यात आहे. जर मी शरण गेलो नाही तर ते त्याला त्रास देतील”, असं पोलीस म्हणत आहेत. त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरही हजर केलं जात नाहीय. ते त्याला रोज पोलीस ठाण्यात बोलवून घेऊन रात्रीपर्यंत तिथे ठेवतात, असं प्रसन्नाने सांगितलं.

एवढंच नव्हे तर मी माझी सोशल मिडिया पोस्ट काढली नाही तर त्याला अडचणीत आणलं जाईल अशीही धमकी त्याला देण्यात आली आहे. काही दिवसांतच पोलीस आणि माझी पत्नी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे आरोप करणार आहेत. तसंच, माझे सोशल मिडिया पोस्ट्स खोटे असल्याचंही माझ्या मित्राकडून वदवून घेणार आहेत. मी याप्रकरणी कोर्टात धाव घेणार असून सध्या मी माझ्या कुटुंबासह तामिळनाडूच्या बाहेर आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणी प्रसन्ना शंकर यांचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दिव्याने केलेल्या तक्रारीनुसार प्रसन्नाची चौकशी सुरू असल्याचं पीटीआयने वृत्तात म्हटलं आहे.