मालमत्तेच्या वाटपावरून झालेल्या वादातून वेलजन ग्रुपचे उद्योगपती जनार्दन राव यांची त्यांच्या नातवाने चाकूने भोसकून हत्या केली. ८६ वर्षीय राव यांचा त्यांच्या २९ वर्षी नातू कीर्ती तेजशी वाद झाला. त्यानंतर त्याने ७० हून अधिक वेळा त्यांच्यावर वार केले. ही घटना गुरुवारी रात्री हैदराबाद येथील सोमाजीगुडा येथे त्यांच्या राहत्या घरी घडली. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, घटना घडली तेव्हा तेजची आईही तिथे होती. या घटनेतून जनार्दन राव यांना वाचवताना तीही जखमी झाली आहे. ती तिचा मुलगा कीर्ती तेजसह जनार्दन राव यांना भेटायला गेली होती. तो अमेरिकेत मास्टर्सचे शिक्षण घेत होता. तिथून तो परतल्यानंतर जनार्दन राव यांना भेटायला गेला. मात्र, मालमत्तेच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला.
वाटणीत योग्य वाटा न दिल्याने हत्या
वाटणीत त्याला त्याचा योग्य वाटा मिळाला नसल्याचा त्याचा दावा आहे. राव यांनी अलीकडेच त्यांच्या मोठ्या मुलीच्या मुलाला वेलजन ग्रुपचे संचालक म्हणून नियुक्त केले हते. त्यांची मुलगी सरोजिनी देवी यांचा मुलगा तेज यांना ४ कोटी रुपयांचे शेअर्सचे वाटप करण्यात आले होते.
हल्ल्यात आईही जखमी
वारसा हक्काच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तेज यांनी राव यांच्यावर अन्याय्य वागणूक दिल्याचा आरोप केला. त्यामुळे त्याने चाकू धरला अन् राव यांच्यावर ७३ वेळा सपासप वार केले. परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई सरोजिनी देवी जखमी झाली. तो घटनास्थळावरून पळाला असून पोलिसांनी त्याची शोधमोहिम सुरू केली. शोधमोहिमेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.