Shocking Rape News From Varanasi : एका १९ वर्षीय मुलीवर सात दिवसांत तब्बल २३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रेदशातील वाराणसी जिल्ह्यात घडली आहे. २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान तिला आरोपींनी विविध हॉटेल्स, हुक्का बार आणि कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटून तिने कुटुंबियांना तिच्यावर ओढावलेली आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या सर्व २३ आरोपींनी शोधण्यासाठी पोलिसांनी तपासकार्य सुरू केले असून सह जणांना अटक केली आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त विदुश सक्सेना यांनी पीटीआयला सांगितले की, पीडित मुलगी २९ मार्च रोजी काही तरुणांसोबत बाहेर गेली होती. परंतु, ती घरी परतली नसल्याने ४ एप्रिल रोजी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७०(१) (सामूहिक बलात्कार), ७४ (विनयभंग), १२३ (विष किंवा हानिकारक पदार्थ देणे), १२६(२) (हालचालीत अडथळा आणणे), १२७(२) (चुकीने बंदिस्त करणे) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मन सुन्न करणारा घटनाक्रम
तक्रारीत, मुलीच्या कुटुंबाने म्हटले आहे की, ती एका मैत्रिणीकडे गेली होती आणि तिथून घरी परतताना तिची भेट एका आरोपीशी झाली. तो तिला त्याच्या लंका येथील कॅफेमध्ये घेऊन गेला. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला. ३० मार्च रोजी तिला रस्त्यात आणखी एक आरोपी आणि तिचा मित्र भेटला. त्यांनीही तिला त्यांच्या बाईकवर बसवून नादेसर येथे सोडण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला.
येथून सुटून ती घरी परतत असताना तिला आणखी एका आरोपीने पकडले. तो तिला एका कॅफेमध्ये घेऊन गेला. तिथे आधीच त्याचे पाच मित्रही उपस्थित होते. तिथे तिला नशेचे औषध दिले आणि बलात्कार केला. १ एप्रिल रोजी, एका आरोपीने आणि त्याच्या मित्राने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे आधीच तीन लोक उपस्थित होते. मुलीला एका क्लायंटला मालिश करण्यास सांगितले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या आरोपीने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर त्याने तिला हॉटेलबाहेर नेले.
नंतर, आरोपींपैकी एक आणि त्याच्या दोन मित्रांनी मुलीला औरंगाबादजवळील एका गोदामात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ती तिथून कशीबशी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि सिग्रा येथील एका मॉलसमोर बसली. पण पुन्हा एका व्यक्तीने तिला खायला देण्याच्या आमिषाने मादक पदार्थ दिले. ती नशेत असतानाच तिला अस्सी घाटात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. त्यांच्याही तावडीतून ती वाचली आणि एका मित्राच्या घरी गेली. तिथे गेल्यानंतर ती नशेत असल्याने झोपी गेली. पण तिथेही तिच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला. अखेर ती तिथून पळून आपल्या घरी आली आणि तिने घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला. यावरून तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.