Shocking News From Uttar Pradesh : पाळीव श्वानाला घाबरणाऱ्या एका मुलाला श्वानाच्या मालकिणीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथील एका निवासी इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला. सीएनएन न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बुधवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास गौर सिटी २ मधील १२ व्या अव्हेन्यू येथे ही घटना घडली. एक महिला तिच्या पाळीव श्वानासह लिफ्टमध्ये शिरली. तिथे आधीच एक मुलगा उभा होता. त्याने श्वानाला पाहताच लिफ्टमध्ये त्याला आणू नका अशी विनंती केली. अगदी त्याने हातही जोडले. तो प्रचंड घाबरला होता, हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमधून स्पष्ट दिसतंय. त्या मुलाची समजूत घालण्यापेक्षा किंवा त्याच्या मनातील भीती दूर करण्यापेक्षा महिलेने मुलाला लिफ्टमधून बाहेर पडण्यास सांगितले. आणि तिला ज्या मजल्यावर जायचं होतं, त्या मजल्याचं बटण दाबलं.

त्या महिलेने मुलाला लिफ्टच्या बाहेर ढकललं. त्यानंतर ती त्याच्या मागे गेली. लिफ्टमधील प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असला तरीही बाहेर काढल्यानंतर तिने नेमकं काय केलं हे कॅमेऱ्यात कैद झालं नाही. पण शेवटी तो मुलगा त्या लिफ्टध्ये शिरला आणि त्याच्या इच्छूक मजल्यावर गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

“१९ फेब्रुवारी रोजी, ग्रेटर नोएडा वेस्टच्या गौर सिटी २ सोसायटीच्या १२ व्या अव्हेन्यूमध्ये एका महिलेने एका मुलाला लिफ्टमधून बाहेर ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली आणि गुन्हा दाखल केला. महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे”, असे डीसीपी सेंट्रल नोएडा शक्ती अवस्थी यांनी सीएनएन-न्यूज१८ ला सांगितले.

या घटनेमुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आणि महिलेला तिच्या श्वानाला पट्टा बांधल्याशिवाय निवासी सोसायटीत का फिरू दिले गेले याबद्दल प्रश्न उपस्थित झाले.

Story img Loader