Gangrape in Uttarpradesh : आपल्या होणाऱ्या पतीबरोबर पिकनिकला गेलेल्या एका तरुणीबरोबर अत्यंत घृणास्पद कृत्य घडलं आहे. तिच्यावर ६ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० एप्रिल रोजी ही घटना घडल असून याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील कसागजंग येथे ही घटना घडली आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
१० एप्रिल रोजी हाजरा कॅनाल येथे पीडित तरुणी तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरायला गेली होती. पण तिथे काही नराधमांनी तिच्या होणाऱ्या पतीला बेदम मारहाण केली आणि तिला खेचत एका खोलीत नेलं. खोलीबाहेर तिच्या होणाऱ्या पतीला बेदम मारहाण सुरू असताना खोलीमध्ये पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार सुरू होते. सहा आरोपींनी आळीपाळीने या पीडित तरुणीवर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या दुर्दैवी घटनेनंतर पीडित तरुणीची अवस्था नाजूक झाली. त्यानंतर ती घरी परतली. घरी परतल्यानंतर तिने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. तिची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना तत्काळ अटक केली आणि एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक माहितीसाठीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.