Crime News Karnataka : एका महिलेच्या घरी तिचे दोन नातेवाईक भेटायला आल्याने तिच्या नवऱ्याने आणि काही जणांनी तिला बेदम मारहाण केली. हातोडा आणि लोखंडी रॉडने मारहाण करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कर्नाटकातील दावणगेरे येथे हा प्रकार घडला आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेदम मारलं
दोन पुरुष नातेवाईक घरी आल्याने महिलेच्या पतीला तिच्या चारित्र्यावर संशय आला. त्यामुळे संतप्त नवऱ्याने तिच्यावर हल्ला केला. यानंतर हे प्रकरण स्थानिक मशिदीत गेलं. पोलिसांनी याप्रकरणी हस्तक्षेप करत कारवाई सुरू केली आहे. चन्नागिरी तालुक्यातील तावरेकेरे गावात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता तावरेकेरे येथील जामिया मशिदीसमोर या महिलेवर हल्ला करण्यात आला. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यामध्ये आरोपी महिलेला हातोडा आणि लोखंडी पाईपने मारहाण करताना दिसत आहे.
पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
११ एप्रिल २०२५ रोजी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानुसार, चन्नागिरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये कलम १०९ (१), १८९ (२), १९० (२), १९१ (३), ११५ (२), ११८ (१), ७६, ३५२ आणि ३५१ (२) तसेच कलम १९० समाविष्ट आहेत.
सहा जणांना अटक
जलदगतीने कारवाई करत दावणगेरेच्या पोलिस अधीक्षक उमा प्रशांत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच, चन्नागिरी पोलिसांनी सहा मुख्य आरोपींना अटक केली. मोहम्मद नयाज (३२), मोहम्मद गौस्पीर (४५), चंदाभाषा (३५), इनायत उल्ला (५१), दस्तगीर (२४),रसूल टीआर (४२) यांना अटक करण्यात आली असून हे सर्व आरोपी तावरेकेरे गावातील रहिवासी आहेत.