Bangkok Earthquake Shocking Videos: म्यानमार आणि बँकॉकमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. या जोरदार भूकंपानंतर दोन्ही देशात हाहाकार उडाला आहे. भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. म्यानमारमध्ये २० तर बँकॉकमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भूकंपानंतरची भीषण दृश्ये समोर येत आहेत. म्यानमार आणि बँकॉकमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर प्राचीन बौद्ध मंदिरांचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान सोशल मीडियावर भूकंपाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एका मेट्रो स्थानकाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
दुपारी ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे हादरे बसल्यानंतर त्यापाठोपाठ ६.८ चे धक्के पुन्हा बसले. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अनेकजण इमारती, रेल्वे स्थानकातून बाहेर पडले आणि मोकळ्या जागेकडे धावू लागले. दरम्यान बँकॉकमधील एका मेट्रो स्थानकावरील सात सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२.५० दरम्यान भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदु मंडाले शहरापासून वायव्येकडे १७.२ किमी अंतरावर होता.
मेट्रो स्थानकावरील व्हिडीओमध्ये प्रवाशी एकमेकांना पकडून वर्तुळात उभे असल्याचे दिसत आहे. तर समोरच उभी असेलली मेट्रो ट्रेन गदागदा हलताना दिसत आहे. ट्रेन चालू नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच बँकॉकमध्ये एका निर्माणाधीन इमारतीचा कोसळतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत अवघ्या काही सेकंदात जमीनदोस्त झाली.
एएफपीने दिलेल्या माहितीनुसार सदर इमारत कोसळल्यानंतर त्याखाली ४३ लोक दबले असल्याचे सांगितले जात आहे.