Viral Video Bengaluru : गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूत गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हत्या, छेडछाड आणि बलात्काराच्या घटनांनी बंगळुरू हादरत आहे. आता एक असाच नवा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन मुलींची एका मुलाने खुलेआम छेड काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बेंगळुरूच्या एका निर्जन रस्त्यावरून दोन मुली जात होत्या. तेवढ्यात मागून एक मुलगा आला आणि त्याने एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना घडल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. पीडितेने कोणतीही तक्रार दाखल केलेली नसली तरी, गरज पडल्यास पोलिस स्वतःहून गुन्हा दाखल करू शकतात.
भारताच्या आयटी राजधानीत महिला सुरक्षा वाऱ्यावर?
३ एप्रिल रोजी बंगळुरूतील बीटीएम लेआउटमधील सुद्दागुंटे पल्या येथील एका निर्जन रस्त्यावर हा प्रकार घडला. पोलीस गुन्हेगार आणि पीडित दोघांचीही ओळख पटवण्याचे काम करत आहेत, व्यक्तींची ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहेत. भारताच्या आयटी राजधानीत महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण होत आहे. वारंवार असे प्रकार घडल्याने नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे.
बंगळुरूच्या रस्त्यावर दोन मुलींची छेड काढण्यात आली pic.twitter.com/k4cB8bDXmr
— Viral Content (@ViralConte97098) April 6, 2025
तर एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय न्याय संहिता ७४, ७५ आणि ७८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.