उत्तर प्रदेशातील सितापूर येथील रमेश कुमार हे काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकले आहेत. मात्र, नुकताच सरकारी अवकृपेने त्यांना जीवनातील सर्वात मोठा धक्का बसला. जेव्हा त्यांची पत्नी ही सरकार दरबारी अधिकृत विधवा असल्याचे त्यांना कळले.


हा धक्कादायक प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा रमेश कुमार काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीच्या बँकेची माहिती मिळवण्यासाठी बँकेत गेले होते. त्याठिकाणी त्यांना पत्नीच्या बँक खात्यावर राज्य शासनाच्या विधवा पेन्शन योजनेचे पैसे जमा झाल्याचे निदर्शनास आले. एकूणच त्यांच्या पत्नीला लग्नाआगोदरच अनेक वर्षांपासून विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकारानंतर रमेश कुमार यांनी सरकारदरबारी चकरा मारत आपण जिवंत असल्याचे दाखले दिले. त्याचबरोबर पत्नीच्या खात्यावर जमा होणारी विधवा पेन्शन योजना थांबवण्यात यावी अशी विनंती प्रशासनाकडे केली. तसेच यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकारानंतर रमेश कुमार यांना आणखी एक मोठा धक्का बसला. तो म्हणजे, अशा प्रकारे विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळणारी त्यांची पत्नी ही एकमेव नव्हती. तर त्यांच्याप्रमाणे अनेक पती जे जिवंत आहेत त्यांच्या पत्नींच्या खात्यावर विधवा पेन्शन जमा होत असल्याचे त्यांना कळले.

हा घोटाळ्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाकडून झालेल्या प्राथमिक चौकशीत तर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे रमेश कुमार यांची पत्नी ज्या गावातील रहिवासी आहे. त्याच गावातील २२ महिलांच्या खात्यांवर या पेन्शनच्या रकमा देण्यात येत होत्या. यातील बहुतेक महिला या आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून करवा चौथचे व्रतही करीत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले असून याला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Story img Loader