महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रामलीला मैदानावर भाषण करत असताना प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तिने स्टेजच्या दिशेने भूट भिरकावल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या व्यक्तिला लगेचच ताब्यात घेतले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जाऊन अण्णांची भेट घेतली.

अण्णांशी यशस्वी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री स्टेजवरुन उपस्थितांना संबोधित करत असताना प्रेक्षकांमधल्या एका व्यक्तिने स्टेजच्या दिशेने बूट भिरकावला. सुदैवाने यामध्ये कोणाला इजा झाली नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.

अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी सरकारला ६ महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन करून अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल-लोकायुक्तांची नियुक्ती या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावरील ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रहाचा आजचा सातवा दिवस होता. हे आंदोलन सुरु केल्यापासून तीन दिवसांंनी अण्णा हजारे यांचे वजन तीन किलोंनी कमी झाले होते. तसेच इतर आंदोलनकर्त्यांचीही प्रकृती खालावली होती.