पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ हे न्यायालयात आले असता एका संतप्त वकिलाने त्यांच्यावर पायातील बूट फेकून मारल्याची घटना शुक्रवारी घडली. लाल मशिदीवर २००७ मध्ये मुशर्रफ यांनी कारवाई केली, त्याचा आपल्या आईला राग होता़ तिच्या समाधानासाठी आपण हे कृत्य केल्याचे या वकिलाने सांगितले.
सदर वकिलाचे नाव तजम्मूल लोधी असे असून सिंध उच्च न्यायालयातून बाहेर पडताना त्याने मुशर्रफ यांच्यावर बूट फेकला. माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह अनेक खटल्यांमध्ये मुशर्रफ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून आपल्या अटकपूर्व जामिनाला १५ दिवसांची मुदतवाढ घेण्यासाठी मुशर्रफ न्यायालयात आले होते.
मुशर्रफ यांच्याभोवती सुरक्षारक्षक आणि विविध वाहिन्यांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे होते. वकिलाने फेकलेला बूट मुशर्रफ यांच्या पुढय़ात पडला. तो बूट मुशर्रफ यांच्यापुढे गर्दी करून उभ्या असलेल्या जमावाच्या पुढय़ात पडल्याचे चित्रीकरणातून स्पष्ट होत आहे.
पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकाऱ्यांनी सदर वकिलास अटक केली असून त्यांना अज्ञात स्थळी नेले. देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा मुशर्रफ यांनी प्रयत्न केला. त्यामुळे मुशर्रफ यांच्यावर आपलाही राग होता, असे लोधी यांनी वाहिन्यांच्या प्रतिनिधींना सांगितले. आपल्या आईचाही त्यांच्यावर राग होता. मात्र आपल्या आईचे काही प्रमाणात आपण आज समाधान केले त्याचा आनंद वाटतो, असेही लोधी म्हणाले.
अटकपूर्व जामिनाला १५ दिवसांची मुदतवाढ
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या अटकपूर्व जामिनाला सिंध उच्च न्यायालयाने शुक्रवारी १५ दिवसांची मुदतवाढ दिली. तथापि त्यांना देश सोडून जाण्यास न्यायालयाने बंदी केली आहे. आपल्यावर सुरू असलेल्या विविध खटल्यांमध्ये मिळालेल्या जामिनाला मुदतवाढ मिळावी म्हणून मुशर्रफ न्यायालयात गेले होते. मुशर्रफ यांना माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि बलुच नेते अकबर बुग्ती यांच्या हत्येसह विविध खटल्यांमध्ये आरोपी करण्यात आले आहे.