Madhya Pradesh Army officers assault Case: मध्य प्रदेशच्या महू येथे बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री फिरायला गेलेल्या दोन प्रशिक्षणार्थी लष्करी जवान आणि त्यांच्या मैत्रिणींना मारहाण करून काही जणांनी पैशांची मागणी केली. तसेच दोन मैत्रिणींपैकी एकीवर आरोपींनी बलात्कार केला. सदर आरोपी दुचाकीवरून रात्री सावज शोधत होते, ज्यांच्याकडून पैशांची लूट करता येऊ शकते, अशी माहिती या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली. आरोपींनी जवानांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १० लाख रुपयांची मागणी केली होती. या घटनेतील पीडित महिला धक्क्यात असून तिने जबाब नोंदविण्यास नकार दिला आहे.
या घटनेचे मध्य प्रदेशमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. एका जवानाच्या तक्रारीवरून सध्या एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यात म्हटल्याप्रमाणे, आरोपींनी पीडित महिलेशी गैरव्यवहार केला. मला शंका आहे की, तिच्याबरोबर काहीतरी वाईट घडले आहे. दुसरीकडे तपास अधिकाऱ्याने पीडितेची वारंवार समजूत घालूनही तिने अद्याप जबाब नोंदविलेला नाही. “एकतर आरोपीला गोळ्या घाला, नाहीतर मला तरी मारून टाका”, हे एकच वाक्य ती वारंवार बोलत आहे.
इंधूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक हितीका वसल यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, पीडिता सध्या जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. तिच्या परिस्थितीत सुधार होईपर्यंत आम्ही वाट पाहू. अनिल, पवन आणि रितेश अशा तीन आरोपींना आम्ही अटक केली आहे. रितेश २०१९ साली एका हत्या प्रकरणातून सुटला होता. इतर तीन आरोपींचाही कसून शोध घेतला जात आहे.
एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, दोन जवान त्यांच्या दोन मैत्रिणींसह लष्कराच्या फायरिंग रेंजनजीक असलेल्या जाम गेट येथे रात्री ११ वाजता फिरायला गेले होते. ते एका निर्जन स्थळी वाहन थांबवून बाहेर बसले होते. यावेळी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लाठ्या आणि रॉडने हल्ला केला. हल्ल्यानंतर जवानाने त्यांना काय हवे असे विचारले, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांना १० लाख रुपये हवे असल्याची मागणी केली. हल्लेखोरांपैकी एकाच्या हातात पिस्तूल होती. तसेच सर्वांनी आपले चेहरे झाकले होते. त्यांचे वय २० ते ३५ दरम्यान होते, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.
विरोधकांकडून भाजपावर टीका
दरम्यान या घटनेचे राजकीय पडसादही उमटले आहेत. सत्ताधारी भाजपावर विरोधकांनी टीका केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, भाजपाच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. महिला अत्याचारा विरोधात भाजपाचा दृष्टीकोन दिवसेंदिवस नकारात्मक होत चालला आहे आणि ही खूप चिंताजनक बाब आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मात्र पोलिसांचा बचाव करताना सांगितले की, पोलिसांनी या घटनेनंतर ताबडतोब कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे, तसेच इतर आरोपींचाही कसून शोध घेतला जात आहे. लवकरच सर्वांना अटक केली जाईल. सरकार अशा प्रकरणात कठोर कारवाई करत असून कायदा त्याचे काम करेल.