दुबई : संयुक्त अरब अमिरातीत एका वर्दळीच्या रस्त्यावर बस थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने १५ जण ठार झाले. त्यात १० भारतीय कामगारांचा समावेश आहे. बस आदळल्यानंतर डाव्या बाजूला कलंडली व पाच मीटर घसरत गेली त्यात १३ जण जागीच ठार झाले त्यात काही बांगलादेशी व भारतीयांचा समावेश आहे.
शारजाची नंबर प्लेट असलेली ही तीस आसनी बस होती व त्यात जेबेल अली येथे जाणारे २७ कामगार होते. अमिरात रस्त्यावर ही बस ट्रकच्या मागच्या बाजूला आदळली.
 जे भारतीय ठार झाले त्यात १० बिहारींचा समावेश आहे. जखमींना रशीद व अल बऱ्हा येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. गाडीचा सांगाडा तोडून जखमींना व मृतांना बाहेर काढावे लागले असे लेफ्टनंट कर्नल अहमद अतीक यांनी सांगितले.
दुबई येथे २२ लाख लोकसंख्येपैकी अनेक जण आशियातून आलेले आहेत.

पाकिस्तानातील आत्मघातकी हल्ल्यात ५ ठार, १४ जखमी
पीटीआय, पेशावर
पेशावरच्या पश्चिमोत्तर भागातील एका स्टेडियममध्ये आत्मघाती हल्लेखोराने रविवारी घडवून आणलेल्या स्फोटात पाच जण ठार झाले, तर १४ जण गंभीर जखमी झाले. या आत्मघाती हल्ल्यात स्टेडियमच्या शेजारी असणाऱ्या मशिदीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
शहरातील मशिदीशेजारी असणाऱ्या अरब नियाज स्टेडियममध्ये तिराह खोऱ्यातील आदिवासी निर्वासितांसाठी शासनाच्या वतीने एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आत्मघाती हल्लेखोर तेथे आला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली.
सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्यामुळे हल्लेखोराने बॉम्बच्या साहाय्याने स्वतला उडवले. आत्मघाती हल्लेखोराने आपल्या अंगावरील जॅकेटमध्ये १० किलो वजनाची स्फोटके लपवली होती. या बॉम्बस्फोट इतका शक्तिशाली होता की, स्टेडियमच्या शेजारील मशिदीची भिंत पडली, तसेच शेजारील काही इमारतींचेही नुकसान झाले.

अफगाणिस्तानातील आत्मघातकी हल्ल्यात पाच ठार
पीटीआय,काबुल
अफगाणिस्तानच्या सैन्यदलाच्या वाहनावर रविवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच नागरिक ठार झाले, तर ३६ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारली नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
खंदहार प्रांतातील मेवेंड जिल्ह्य़ात हा हल्ला करण्यात आला. यात काही सैनिकही जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांकडून सातत्याने अफगाणिस्तानच्या सुरक्षारक्षकांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावर्षांअखेरीस आंतराष्ट्रीय सुरक्षा दल माघारी जाणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर हे हल्ले चिंतेचा विषय ठरले आहेत.

Story img Loader