केंद्रीय मंत्री निहालचंद यांचे नाव एका बलात्काराच्या प्रकरणात पुढे आल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) स्पष्ट केले आहे.एक मंत्री बलात्कारासारखा गुन्हा करतो त्यामुळे त्यालाही सर्वसामान्य गुन्हेगाराप्रमाणेच शिक्षा मिळाली पाहिजे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण निहालचंद यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी सांगितले. जयपूर येथील एका २४ वर्षीय महिलेने नोंदविलेल्या एफआयआरमध्ये निहालचंद यांच्यासह अन्य १६ जणांची नावे आहेत. आरोपींनी आपल्यावर बलात्कार केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. निहालचंद हे केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री असून मोदी मंत्रिमंडळात राजस्थानातील ते एकमेव खासदार आहेत.
बिहारमध्ये प्रसादातून ६० जणांना विषबाधा
पटणा : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एका गावात प्रसादातून तब्बल ६० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आह़े मंगळवारी प्रसाद खाल्ल्यानंतर या सर्वाची प्रकृती अचानक बिघडली़ यापैकी ४० जणांना मुझफ्फरपूर शहरातील श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े तेथे त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल़े प्रसाद खाल्ल्यानंतर सर्वाना उलटय़ांचा त्रास सुरू झाला़ त्यामुळे त्यांना आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक असणाऱ्यांना शहरातील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितल़े
जनता दलाच्या आमदाराच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला
पाटणा: संयुक्त जनता दल आमदार रेणू कुशवाह यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला त्यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले असून, त्याबाबतचा निर्णय मंगळवारी पाटणा उच्च न्यायालयाने राखून ठेवला. न्यायालय याबाबत उद्या निकाल जाहीर करणार आहे. रेणू कुशवाह आणि अन्य आमदारांवर बजाविण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी आणखी एक दिवस मुदत दिली आहे. अर्जदाराचे वकील एसबीके मंगलम आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. ज्योती सरन यांनी आपला निकाल उद्यापर्यंत राखून ठेवला आहे.
अन्य पक्षांत गेलेल्या काँग्रेसजनांची अवस्था ‘गुलामा’सारखी – रेड्डी
विजयवाडा (आंध्र प्रदेश): लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी अन्य पक्षांत प्रवेश केला ते नेते आता दुसऱ्या पक्षात गुलामासारखे राहात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.काँग्रेस पक्ष सत्तेत असताना ज्यांनी लाभ पदरात पाडून घेतला त्यांनी पक्ष अडचणीत असताना दुसऱ्या पक्षाची कास धरली. मात्र आता ते त्या पक्षात गुलामासारखे राहात आहेत, कारण तेथे त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही, असे आंध्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एन. रघुवीर रेड्डी यांनी म्हटले आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तेलुगु देसम, वायएसआर काँग्रेस किंवा अन्य पक्षांत प्रवेश केला होता. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत रेड्डी यांनी कार्यकर्त्यांना, पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
चंद्राबाबू यांचा पुत्र लोकेश पक्ष कार्यात सक्रिय
हैदराबाद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे(टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपले पुत्र लोकेश यांची पक्ष कार्यकर्त्यांच्या कल्याण निधीचे सहसंयोजक म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे लोकेश यांचा पक्षाच्या व्यवहारात थेट आणि सक्रिय सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गरजू पक्षकार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे पक्षाच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. अशा प्रकारे निधी उभारावा ही कल्पनाच लोकेश यांची होती. कार्यकर्त्यांच्या शैक्षणिक, आरोग्यसेवा आणि अन्य तातडीच्या गरजा भागविण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.लोकेश यांनी पक्षाच्या बैठकीत सदर कल्पना मांडताच त्याला चंद्राबाबू नायडू यांनी त्वरित पाठिंबा दर्शविला आणि २० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली होती.
ब्रिटनचे व्हिसा धोरण चीनसाठी शिथिल
लंडन : चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या आगामी ब्रिटन दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर ब्रिटनने चिनी नागरिकांसाठी व्हिसा धोरण शिथिल केले आहे. चिनी पर्यटक आणि व्यावसायिक यांच्यासाठी हे नियम शिथिल करण्यात आल्याची माहिती ब्रिटनच्या संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. तिबेटप्रकरणी ब्रिटन आणि चीन यांच्यातील संबंध बिघडले होते. त्यात सुधारणा व्हावी यासाठी तसेच व्यापारी संबंध सुधारावेत म्हणून ब्रिटनने हे धोरणी पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. तसेच ब्रिटनसह अन्य २६ युरोपीय देशांसाठी एक खिडकी पद्धतीने व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही ब्रिटनतर्फे देण्यात आले आहे.
‘अमेरिकेतील शिखांच्या समस्यांकडे लक्ष द्या’
वॉशिंग्टन : १९८४ च्या शीख दंगलींनंतर अमेरिकेमध्ये राजकीय आश्रय घेत राहणाऱ्या शिखांना व्हिसा मिळण्यात अडचणी येत आहेत. भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि आमची समस्या सोडवावी अशी मागणी दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या अध्यक्षांनी केली आहे. याआधीच्या काँग्रेसप्रणीत सरकारच्या धोरणांचा केंद्राने पुनर्विचार करावा आणि अमेरिकेतील शीख समुदायाच्या नैसर्गिक हक्कांचे रक्षण करावे असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
‘अतिरेक्यांना रोखा’
इस्लामाबाद : पाकिस्तानातून मोठय़ा संख्येने अतिरेकी अफगाणिस्तानात पळून जात आहेत. त्यांना अटकाव करा, अशी सूचना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांना केली आहे. सोमवारी रात्री या दोन देशांच्या सीमांवरील ‘दुर्लक्षित’ भागातून तब्बल २००० अतिरेक्यांनी पाकिस्तानची सीमारेषा ओलांडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्या पाश्र्वभूमीवर शरीफ यांनी करझाई यांना फोन करून उपरोक्त विनंती केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. दरम्यान पाकिस्तानी फौजांनी केलेल्या हवाई कारवाईत मंगळवारी १५ दहशतवादी ठार झाले.
इराणशी अण्वस्त्रांसंबंधी लवकरच करार
वॉशिंग्टन : व्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराण यांच्यात इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविषयक चर्चा सुरू आहे. या चर्चेत एका परस्पर सहमती कराराचा मसुदा तयार करण्यात येत आहे. आणि येत्या २० जुलैपर्यंत उभय राष्ट्रांचे या मसुद्यावर एकमत होईल, अशी आशा अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाटाघाटींची बोलणी अत्यंत सकारात्मक वातावरणात सुरू असून येत्या २० जुलैच्या आत त्यामध्ये काही विघ्ने येणार नाहीत, अशी आपल्याला आशा असल्याचेही एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दिल्लीत ई-रिक्षांना दिलासा
नवी दिल्ली : ६५० वॉट क्षमतेची मोटर असलेल्या इलेक्ट्रॉनिक रिक्षांना केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा दिला आहे. या रिक्षांना मोटारविरहित रिक्षांचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा गडकरी यांनी केली. तसेच आता वाहतूक हवालदार आणि परिवहन विभाग अशा रिक्षा चालविणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करू शकणार नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.