पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड आणि बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी झारखंडमधील देवघर येथील विमानतळाचं उद्घाटन केलं आहे. यावेळी केलेल्या जाहीर भाषणातून त्यांनी विरोधीपक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख न करता आडमार्गाने केल्या जाणाऱ्या राजकारणापासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. आडमार्गाने केलेलं राजकारण देशासाठी विध्वंसक ठरू शकतं, असंही ते म्हणाले.

झारखंडच्या देवघर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आडमार्गाने केलेलं राजकारण देशासाठी विनाशकारी ठरू शकतं. अशाप्रकारे केल्या जाणाऱ्या राजकारणापासून लोकांनी दूर राहायला हवं. सध्याच्या काळात आडमार्गानं केलं जाणारं राजकारण सर्वात मोठं आव्हान आहे. आडमार्गाने राजकारण करून मतं मिळवणे खूप सोपं आहे. पण एखाद्या देशातील व्यवस्था आडमार्गाच्या राजकारणावर अवलंबून असेल, तर ते देशाच्या शॉर्टसर्किटला कारणीभूत ठरू शकतं.”

“त्यामुळे मी देशवासियांना आवाहन करतो की, त्यांनी आडमार्गाने केल्या जाणाऱ्या राजकारणापासून दूर राहावं. कारण जे आडमार्गाचं राजकारण करतात ते कधीही नवीन विमानतळ किंवा आधुनिक महामार्ग बांधू शकत नाहीत. आडमार्गाचं राजकारण करणाऱ्यांना कधीही एम्स (AIIMS) सारखी संस्था उभारता येणार नाही. ते प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी कठोर मेहनत घेऊ शकत नाही,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा- “मविआ सरकारने अडीच वर्षात केवळ टाइमपास केला”, ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

पुढे पीएम मोदी म्हणाले, “भाजपा सरकारने देशात कार्यसंस्कृती, राजकीय संस्कृती आणि प्रशासकीय मॉडेल आणलं आहे. याचाच एक भाग म्हणून मला विमानतळाच्या उद्घाटनासाठी देवघरला येण्याची संधी मिळाली. आज मी त्याचं उद्घाटन केले. याआधी प्रकल्पांच्या केवळ घोषणा झाल्या, २-३ सरकार बदलल्यानंतर त्याची पायाभरणी झाली. पण अनेक सरकारं येऊन गेल्यानंतरआजचा दिवस उजडला,” असा टोलाही मोदींनी विरोधकांना लगावला आहे.