पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सूट-बुटातील सरकार अशी टीका करणाऱया कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. आम्हाला सुटा-बुटातील सरकार म्हणून हिणवणाऱया राहुल गांधी यांना गरिबांनी कधीच सूट-बूट घालू नये, असे वाटते काय, असा प्रश्न नायडू यांनी उपस्थित केला. त्याचवेळी राहुल गांधी यांनी मोदींवर कितीही टीका केली, तरी मोदी हेच गरिबांचे उद्धारकर्ते आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.
मोदी सरकारला पुढच्या आठवड्यात एक वर्ष पूर्ण होते आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत नायडू म्हणाले, राहुल गांधी यांनी संसदेमध्ये कोणताही मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आत्तापर्यंत त्यांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे चुकीचे ठरलेले आहेत. शेतकरी आत्महत्या आणि अमेठीतील फूडपार्क संदर्भात त्यांनी केलेले वक्तव्यही दिशाभूल करणारे होते. सर्वात आधी राहुल गांधी यांनी रोजच्या रोज सभागृहामध्ये उपस्थित राहायला हवे. कधीतरी सभागृहात येऊन आरोप करण्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी मोदी यांच्या कारभाराला शून्य गुण दिले आहेत. पण मला असे म्हणायचे आहे की जे स्वतः शून्य आहेत. त्यांना केवळ शून्यच दिसतो.
संसदेचे अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी सुटीवर गेले होते. त्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, हे सुद्धा यातून स्पष्ट होते. आम्ही कधी त्यावरून त्यांच्यावर टीका केली नाही. मोदी जरी परदेश दौऱयावर जात असले, तरी ते कुठे जाताहेत, याची माहिती सर्वांना असते. मात्र, राहुल गांधी सुटीसाठी कुठे गेले होते, याची माहिती कोणालाच नाही, अशीही टीका नायडू यांनी त्यांच्यावर केली.
गरिबांनी सूट-बूट घालू नये असे राहुल गांधींना वाटते काय – वेंकय्या नायडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सूट-बुटातील सरकार अशी टीका करणाऱया कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
First published on: 20-05-2015 at 11:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should the poor not wear suit boot venkaiah naidu