आपण फक्त एखादा हल्ला झाल्यानंतरच प्रत्युत्तर द्यायचे का? त्याऐवजी आपण अगोदरच हल्ले होणारच नाहीत, यासाठी आक्रमकपणे पावले उचलली पाहिजेत, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान मारले गेले होते. या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दहा नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश , ओदिशा , उत्तर प्रदेश , तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहण्याची शक्यता आहे.

या बैठकीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह यांनी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी वेगळी रणनीती अवलंबण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. लोकशाही नष्ट करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. मात्र, त्याचवेळी नक्षलवादी हल्ल्याचा आधीच छडा लावण्यासाठी शोध यंत्रणा विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपण फक्त एखादा हल्ला झाल्यानंतर प्रत्युत्तर द्यायचे का? त्याऐवजी आपण अशाप्रकारचे हल्ले रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आक्रमक मानसिकता अंगीकारली पाहिजे. तसेच नक्षली भागातील सुरक्षा आणि पायाभूत सुविधांवर भर दिला पाहिजे, असे राजनाथ यांनी सांगितले.

सुकमा हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. गेल्या २० वर्षात नक्षलवादी हल्ल्यात १२ हजार लोकांनी प्राण गमावले आहेत. मात्र, आम्ही लवकरच पूर्ण क्षमतेनिशी आणि नव्या रणनीतीने नक्षलवादाचा बीमोड करू, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. त्यासाठी नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळणे, हे आमचे प्रमुख धोरण असेल. बंदुकीचा धाक दाखवून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी ठरणार नाही. त्यासाठी समांतर गुप्तचर यंत्रणा विकसित करण्याची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याने हादरून गेलेल्या केंद्र सरकारने, यापुढे नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी वेगळी रणनीती अंमलात आणली जाईल, असे संकेत दिले होते. जेथे ही घटना घडली त्या चिंतागुफा परिसरातील जंगलामध्ये वार्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारांना, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी नक्षलींशी लढण्याची शर्थ केल्याच्या खाणाखुणा दिसून आल्या. तसेच, हल्ल्यातून बचावलेल्या जवानांनीही त्याबाबतची माहिती दिली. मात्र, मुळात हा एवढा मोठा हल्ला होईल, याची गंधवार्ताही गुप्तचर यंत्रणांना नव्हती. अशा प्रकारचा हल्ला करण्याची तयारी नक्षलवादी करीत आहेत, याची काहीच कल्पना नव्हती, अशी कबुली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित झाला होता.

Story img Loader