श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाला आज कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी कोर्टाला हे सांगितलं की आफताब पूनावाला हा एक ट्रेन्ड शेफ आहे. त्याला मांसाचे तुकडे केल्यानंतर ते जतन करून कसे ठेवायचे याची माहिती आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे त्याने फ्रिजमध्ये साठवले होते आणि एक एक करून तो ते तुकडे फेकून देत होता असंही पोलिसांनी सांगितलं. आफताब पूनावाला दिल्लीतल्या साकेत कोर्टात हजर केलं होतं त्यावेळी दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली.
काय म्हटलं आहे दिल्ली पोलिसांनी कोर्टात?
आफताब पूनावाला हा ताज हॉटेलमध्ये काम करणारा प्रशिक्षित शेफ आहे. त्याला माहित आहे की तुकडे केल्यानंतर मांस कसं जतन करतात. त्यामुळेच त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर जेव्हा तिच्या शरीराचे तुकडे केले तेव्हा ड्राय आईस, उदबत्त्या हे सगळं ऑनलाइन पद्धतीने मागवलं होतं. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आणि तिच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर त्याने श्रद्धाची अंगठी त्याच्या नव्या गर्लफ्रेंडला दिली अशीही माहिती पोलिसांनी साकेत कोर्टात दिली. दिल्ली पोलिसांनी कोर्टाला आज हत्या झाल्यापासूनचा पूर्ण घटनाक्रम सांगितला. दिल्ली पोलिसांच्या वतीने वकील अमित प्रसाद यांनी बाजू मांडली. तर आफताबने त्याचे वकील बदलले आहेत. आफताकडून ही केस आता एम. एस. खान लढवत होते. पण त्यांनी आता आपल्याकडची सगळी कागदपत्रं नव्या वकिलांना दिली आहेत.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनिष खुराणा कक्कड यांनी आफताबच्या नव्या वकिलांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून पुढची तारीख दिली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २० मार्चला होणार आहे. आफताबने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची हत्या केली. मे २०२२ मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते तो रोज जंगलात जाऊन फेकत होता.
श्रद्धाच्या हत्येचं कारण काय?
चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार १७ मे २०२२ ला श्रद्धा तिच्या एका मित्राला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. १८ मे २०२२ च्या दुपारी ती परतली.श्रद्धा तिच्या दुसऱ्या मित्राच्या घरी राहिली म्हणून आफताब नाराज झाला होता. याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी आधी पोलीस कोठडीत करण्यात आली होती.त्यानंतर आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आफताबची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ फेब्रुवारी २०२३ नंतर आरोपी आफताबला चार्जशीटची प्रत दिली जाईल. आफताबला पॉलिग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले त्यांचा यामध्ये समावेश आहे.
१८ मे २०२२ ला काय घडलं?
१८ मे २०२२ ला श्रद्धा आणि आफताब या दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर या दोघांचा आवाज वाढला त्यावेळी श्रद्धा जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी आफताबने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. हे भांडण का झालं होतं त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नव्हतं. जे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमुळे समोर आलं आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे आफताब पूनावालाने ३५ तुकडे केले होते. ते तुकडे तो महारौली येथील जंगलात फेकत होता.