गेल्या काही दिवसांपासून देशभर चर्चेत आलेल्या श्रद्धा वाळकर खून प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत पोलीस तपासात असहकार पुकारणारा श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावाला याच्या नार्को टेस्टला आता दिल्ली न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यासोबतच, आफताबच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे श्रद्धाचा खून आफताबनंच केला असल्याचा कबुलीजबाब जरी पोलिसांकडे असला, तरी या प्रकरणातलं गूढ उकलण्यात या निर्णयामुळे मोठी मदत होण्याची शक्यता आहे. आफताबच्या नार्को टेस्टमधून अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आफताबच्या सहमतीनंतरच टेस्टला दिली परवानगी
दिल्ली पोलिसांनी आफताबच्या नार्को टेस्टची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये आफताबनं पोलिसांना सहकार्य केलं नसल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयासमोर केला आहे. त्यामुळे त्याच्याकडून या सगळ्या प्रकरणाचं वास्तव जाणून घेण्यासाठी आणि त्याच्या दाव्यांमधलं तथ्य शोधून काढण्यासाठी नार्को टेस्टची परवानगी मिळावी, अशी मागणी दिल्ली पोलिसांकडून करण्यात आली होती. यावर आता दिल्ली कोर्टानं मंजुरी दिली आहे. यासाठी आफताबची सहमती घेतल्यानंतरच टेस्टची परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
आफताबवर हल्ल्याची शक्यता?
दरम्यान, आफताबवर हल्ला होण्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी सुनावणीच्या आधी व्यक्त केल्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. सुनावणीसाठी आफताबला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती. “आफताबवर काही धार्मिक आणि समाजविघातक शक्ती हल्ला करू शकतात”, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. त्याआधारे न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितीस परवानगी दिली.
“मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकानं कायद्याचं पालन करावं. काहींना कदाचित वाटू शकेल की न्याय मिळाला नाही. पण न्याय नक्कीच दिला जाईल. या प्रकरणावर माध्यमांमध्ये झालेली चर्चा आणि यासंदर्भात संबंधितांच्या असणाऱ्या भावना यांची मला पूर्ण कल्पना आहे. आफताबवरील हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊनच मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देतोय”, अशी टिप्पणी न्यायदंडाधिकारी अविरल शुक्ला यांनी यावेळी केली.