श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर सोमवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. यानंतर आज सकाळी ८.३० वाजता आफताबला पॉलिग्राफी टेस्टच्या दुसऱ्या फेरीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये नेलं जात असताना कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. आफताबला नेणाऱ्या पोलीस वाहनावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आफताबला पोलीस आणि कारागृह सुरक्षेसहित निमलष्करी दलाची सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या जवानांना अत्याधुनिक शस्त्रांसहित तैनात करण्यात आलं आहे. याशिवाय कारागृहातील कैद्यांची वाहतूक करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या थर्ड बटालियनमधील पोलिसांची संख्याही वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दिल्ली पोलिसांना मोठं यश, श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी वापरलेलं हत्यार आणि रिंग जप्त
सोमवारी संध्याकाळी आफताबला फॉरेन्सिक लॅबमधून पुन्हा कारागृहात नेलं जात असताना हातात तलवारी घेतलेल्या काहीजणांनी पोलिसांच्या वाहनाला घेरलं आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी हवेत गोळीबार केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.