देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत असल्याचं दिसून येत आहे. त्यात दिल्ली न्यायालयाने श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिल्यामुळे आता यातूनही या प्रकरणाचे नवे कंगोरे समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर श्रद्धा वालकरनं २०२०मध्ये नवी मुंबईत पोलिसांना लिहिलेलं एक पत्र समोर आलं असून त्यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पत्रावर पोलिसांनी कार्यवाही केली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली आहे. त्यामुळे या पत्राचा मुद्दा चर्चेत आला असताना आता राज्याच्या काही माजी पोलीस अधिकाऱ्यांनीही पोलिसांच्या या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.
श्रद्धानं नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाण्यात २०२०मध्ये आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. यामध्ये आफताब आपल्याला जीवे मारू शकतो, अशी भीतीही तिने व्यक्त केली होती. “आफताबनं मला अनेकदा मारहाण केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करत आहे. आज त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मला भीती वाटतेय की तो मला जीवे मारून माझे तुकडे करेल आणि फेकून देईल. मला जर काही झालं, तर त्यासाठी आफताब कारणीभूत असेल”, असं श्रद्धानं या पत्रात म्हटलं होतं. यानंतर काही दिवसांनी तिने आपली तक्रार मागेही घेतली होती.
दरम्यान, या पत्रावरून वाद सुरू झालेला असताना त्यावर राज्यातील काही माजी पोलीस अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना परखड मत व्यक्त केलं आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी बिपिन बिहारी यांनी यासंदर्भात पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. “आफताब पूनावाला याला किमान पोलीस स्टेशनला बोलवून समज द्यायची गरज होती. या प्रकरणातील तथ्थ्यांचा आढावा घेऊन जर पोलिसांनी तेव्हाच तातडीने कार्यवाही केली असती, तर आफताब आणि श्रद्धा तेव्हाच वेगळे झाले असते”, असं ते म्हणाले आहेत. “जर आफताबला तेव्हाच समज दिली असती, तर श्रद्धाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास काय होऊ शकतं, याची भीती त्याच्या मनात राहिली असती”, असंही एका माजी पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
Shraddha Murder Case: “…तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!
पोलीस स्थानकात शेकडो अर्ज येतात, पण…
दरम्यान, पोलीस स्थानकात रोज शेकडो अर्ज येत असतात असाही दावा पोलिसांनी त्यावर कार्यवाही न करण्याबाबत केला जात आहे. मात्र, यावर काही माजी पोलीस अधिकाऱ्यांची वेगळी भूमिका आहे. “आलेला प्रत्येक अर्ज बघून त्यातील आरोपांचं गांभीर्य पाहून कारवाई करणं हे पोलिसांचं कामच आहे. रोज शेकडो अर्ज येत असले, तरी त्यातील गंभीर आरोपांवर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असतं”, अशी प्रतिक्रिया एका माजी पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
कायद्यात बदल आवश्यक
दरम्यान, राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी यासंदर्भातल्या कायद्यातच बदल करण आवश्यक असल्याचं नमूद केलं आहे. “पोलिसांशी अशा प्रकारे कोणत्याही माध्यमातून गंभीर परिस्थितीविषयी संवाद साधला गेल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना असं गरजेचं आहे. सध्या पोलिसांना अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कारवाई करण्याचे अधिकार नाहीत”, असं दीक्षित म्हणाले.