दिल्लीत आपली प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या आरोपी आफताब पूनावाला याची पॉलीग्राफी चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान आफताबकडून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली असून, यामुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. आफताबने आपण आधीपासूनच श्रद्धाच्या हत्येचा कट रचल्याचं आणि त्यासाठीच तिला घेऊन दिल्लीला गेल्याचं त्याने कबूल केलं आहे.

आफताबला पॉलीग्राफी चाचणीत सात प्रश्न विचारण्यात आले. या सातपैकी दोन प्रश्नांना त्याने नाही, तर उर्वरित पाच प्रश्नांना हो असं उत्तर दिलं. जाणून घ्या नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले.

१) तू श्रद्धाची हत्या केलीस का?
उत्तर – हो

२) १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केलीस का?
उत्तर – हो

३) श्रद्धाच्या शरिराचे तुकडे जंगलात फेकले का?
उत्तर – हो

४) श्रद्धाच्या हत्येचा कट आधीपासूनच रचला होता का?
उत्तर – हो

५) श्रद्धाची हत्या केल्याचा काही पश्चाताप आहे का?
उत्तर – नाही

६) हत्येसाठीच श्रद्धाला दिल्लीत आणलं होतं का?
उत्तर – हो

७) तू हत्या केल्याचं तुझ्या कुटुंबाला माहिती होतं का?
उत्तर – नाही

Delhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे

नेमकी घटना काय?

वसईतील २६ वर्षीय तरुणी श्रद्धाची तिचाच प्रियकर आफताबने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं.

पोलीस आफताबपर्यंत कसे पोहोचले?

श्रद्धा घर सोडून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून तिचा कोणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन बंद असल्याने तसंच सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स बंद असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

तपासात श्रद्धाचा फोन मे महिन्यापासासूनच बंद असल्याचं आढळलं होतं. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावलं होतं. ‘ती भांडण करुन घरातून निघून गेली. पण ती कुठे गेली हे मला माहिती नाही,’ असं त्याने पोलिसांना सांगितलं. पण त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली असता संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या .

Story img Loader