Shraddha Walkar Case Update : गेल्यावर्षीचा नोव्हेंबर महिना उजाडला तोच श्रद्धा वालकरच्या हत्येच्या धक्कादायक घटनेने. तिची हत्या झाली होती मे २०२२ मध्ये. परंतु, या हत्येचा छडा लागला ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात. त्यामुळे नोव्हेंबरचा संपूर्ण महिना श्रद्धा वालकर संदर्भातील वृत्तांमुळे चर्चेत राहिला. आता या घटनेला जवळपास वर्षे उलटले आहे. श्रद्धाची हत्या झाल्याचं समोर येऊन तिचा मारेकरीही पकडला गेला असला तरीही न्यायलय आणि पोलिसांकडून पुढचं कोणतंच पाऊल उचललं गेलं नसल्याचं श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वसईची श्रद्धा वालकर (२७) दिल्लीत अफताब पुनावाला (२८) याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या दोघांच्या नात्याला श्रद्धाच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे घरातून भांडून श्रद्धा दिल्लीला स्थायिक झाली होती. परंतु, अफताबने १८ ते २० मे दरम्यान छत्तरपूर येथील त्यांच्या राहत्या घरात श्रद्धाची निर्घुण हत्या केली. परंतु, ही घटना नोव्हेंबरमध्ये उजेडात आली. श्रद्धाशी संपर्क होत नसल्याने तिच्या वडिलांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर, नोव्हेंबरमध्ये या घटनेचा छडा लागला.

मला मुलीवर अंत्यसंस्कारही करता आले नाहीत

अफताबने अत्यंत थंड डोक्याने पण निर्दयीपणे तिची हत्या केली होती. तिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून जवळपास २० ठिकाणी पुरले होते. अफताबने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. त्यानुसार, तिच्या शरीराचे काही तुकडे सापडले. परंतु, हे तुकडे कुटुंबियांकडे सोपवण्यास पोलिसांनी नकार दिला. विकास वालकर यांना त्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार करायचे होते. परंतु, तपासाच्या दृष्टीने पोलिसांकडून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे श्रद्धाच्या कुटुंबीयांना देण्यात आले नाहीत. तसंच, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या प्रकरणाशी संबंधित कोणतीच माहिती पोलिसांकडून मिळालेली नसल्याचंही श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं.

हेही वाचा >> Flashback 2022: श्रद्धा वालकर, अंकिता सिंह ते अंकिता भंडारी, २०२२ सालातील निर्घृण खून ज्यामुळे संपूर्ण देश हादरला!

“मी माझ्या मुलीसोबत जास्त बोललो नाही. परंतु, आता त्याचा मला पश्चाताप होतोय”, अशी खंत श्रद्धाच्या वडिलांनी बोलून दाखवली. ते पुढे म्हणाले की, मी या प्रकरणाचा विचार करत राहिलो. काय करावं हे मला कळत नाही. मी अनेक महिन्यांत दिल्लीलाही गेलेलो नाही.

“मी पहिल्यांदा अफताबला पोलीस ठाण्यात भेटलो. मी त्याला माझ्या मुलीबद्दल विचारलं होतं. तेव्हा त्याने माझ्याकडे पाहून ती या जगात नाही असं सांगितलं. त्यानंतर त्याने माझ्या मुलीची कशी हत्या केली याचा घटनाक्रम सांगितला. मला तो घटनाक्रम ऐकवत नव्हता. पण तरीही मी ऐकत उभा राहिलो”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

याबाबत माहिती देताना एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, याप्रकरणी तपास पूर्ण झाला असून पुरावे आणि आरोपपत्र दाखल झाले आहेत. तसंच, अफताबविरोधात खुनाचे आरोपही निश्चित करण्यात आले आहेत. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की त्यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, शस्त्रे, हाडे आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. वालकरच्या नमुन्यांशी किमान १७ ते १९ हाडे जुळली आहेत.

ती इमारत रिकामी?

अफताबने ज्या इमारतीत श्रद्धाची हत्या केली ती इमारत रिकामी आहे. या इमारतीचे फोटो काढायलाही अनेक जण येतात. या इमारतीच्या आजूबाजूला राहणारे रहिवासी अद्यापही भीतीच्या छत्रछायेत आहेत. त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. तसंच, आजूबाजूच्या इमारतीत राहणाऱ्या लहान मुलांनाही येथे फिरकू दिलं जात नाही, अशी माहिती एका महिलेने इंडियन एक्स्प्रेसला दिली.

Story img Loader