देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. २०२०साली श्रद्धा खांद्याला आणि पाठीला गंभीर जखम झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. अशा जखमी अवस्थेत आफताब स्वत: श्रद्धाला डॉक्टरांकडे उपचारांसाठी घेऊन आली होती, असा खुलासा तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. त्यापाठोपाठ आता श्रद्धाच्या मित्रानं मोठा दावा केला आहे.एएनआयनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. २०२०मध्येच श्रद्धानं आफताब तिचा जीव घेईल, अशी भिती पोलिसांकडे व्यक्त केली होती, असा दावा तिचा मित्र राहुल राय यानं केला आहे.
आफताबविरोधात तक्रार
२०२०मध्येच आफताबविरोधात श्रद्धानं तक्रार दाखल केली होती, असं राहुल रायनं म्हटलं आहे. “२०२०मध्ये आम्ही सगळ्यांनी तिला आफताबविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली होती. तिने स्वत: आमच्याकडे मदत मागितली होती. आफताब तिला मारहाण करतो, असं ती म्हणाली होती. आम्ही तिला घरी घेऊन गेलो होतो. पोलिसांनी तेव्हा आफताबला चौकशीसाठी ताब्यात घेऊ असा सल्ला दिला होता. पण त्यावर तिनेच नकार दिला होता. नात्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात असं तिने म्हटलं होतं”, असा दावा राहुल रायनं एएनआयशी बोलताना केला आहे.
“आफताबचे दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध होते”
“दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तिला पुन्हा चौकशीसाठी स्टेशनला बोलवलं होतं. तेव्हा ती म्हणाली की आफताब तिचा जीव घेईल, अशी भिती तिला वाटतेय. त्यानं याआधीही आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असंही ती पोलिसांना म्हणाली. आफताबनं तिला अनेकदा मारहाणही केली होती. आफताबनं तिला घरात कोंडलं होतं, त्याचे दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध होते, तो दुसऱ्या मुलींशी बोलायचा, असंही तिने सांगितलं होतं. आफताब अंमली पदार्थांचं सेवन करतो, असंही तिने पोलिसांना सांगितलं होतं”, असा दावा राहुल राय यानं केला आहे.
“जेव्हा पुन्हा आम्ही तिच्याशी संपर्क केला, तेव्हा ती म्हणाली काळजी करू नका. नात्यामध्ये अशा गोष्टी होतच असतात. त्यानंतर आमचा तिच्याशी कधीही संपर्क झाला नाही” असंही राहुल राय म्हणाला.
दरम्यान, एकीकडे श्रद्धाच्या खून प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत असताना दुसरीकडे आफताबच्या नार्को टेस्टची परवानगी दिल्ली कोर्टानं दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.