श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात पोलिसांनी ६ हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. ६ हजार ६२९ पानांच्या चार्जशीटमध्ये पोलिसांनी विविध खुलासे केले आहेत. गुन्हा घडल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलीस किंवा तपास यंत्रणांकडे ९० दिवसांचा अवधी असतो. मात्र ७५ दिवसांतच चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. श्रद्धा वालकर ही वसईमध्ये राहणारी तरूणी होती. तिची हत्या दिल्लीत करण्यात आली. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालानेच तिला ठार केलं. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रकरण उघडकीस आलं. आफताब मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकत होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आफताबला अटक करण्यात आली.
दिल्ली पोलिस सह आयुक्त मीनू चौधरी यांनी काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांनी आयुक्त मीनू चौधरी यांनी सांगतिलं की या प्रकरणातल्या हत्याकांडाच्या तपासासाठी पोलिसांनी ९ पथकं तयार केली होती. तसंच एसआयटी स्थापन केली होती. या गुन्ह्याचं परिक्षेत्र चार राज्यांमध्ये आहे. दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यात तपास करण्यात आला.
सह पोलीस आयुक्त मीनू चौधरी यांनी सांगितलं की आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. त्यामुळे हे तुकडे गोळा करण्यासाठी आम्हाला ही पथकं तयार करावी लागली. प्रत्येक टीमने आफताबची चौकशी केली त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधून ताब्यात घेतले होते. आफताब पूनावालासोबत एका नाही तर विविध पोलीस पथकांनी चौकशी केली. एका तज्ज्ञालाही पोलिसांनी या तपासात सहभागी केलं होतं. जिथे गुन्हा घडला तिथे आफताबला नेऊनही चौकशी करण्यात आली होती असंही पोलिसांनी चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.
आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टचाही चार्जशीटमध्ये समावेश
सह पोलीस आयुक्त मीनू चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आफताबची नार्को चाचणी आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. गुरुग्राम आणि दिल्ली या ठिकाणी मिळालेलं सीसटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलं. श्रद्धाची हत्या केल्यानंतर मृतदेह ज्या हत्यारांनी कापला ती हत्यारंही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सगळ्या पुराव्यांसह ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीटमध्ये १५० साक्षीदारांच्याही नोंदी आहेत.
श्रद्धाच्या हत्येचं कारण काय?
चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार १७ मे २०२२ ला श्रद्धा तिच्या एका मित्राला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. १८ मे २०२२ च्या दुपारी ती परतली.श्रद्धा तिच्या दुसऱ्या मित्राच्या घरी राहिली म्हणून आफताब नाराज झाला होता. याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी आधी पोलीस कोठडीत करण्यात आली होती.त्यानंतर आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आफताबची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ फेब्रुवारी २०२३ नंतर आरोपी आफताबला चार्जशीटची प्रत दिली जाईल. आफताबला पॉलिग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले त्यांचा यामध्ये समावेश आहे.
१८ मे २०२२ ला काय घडलं?
१८ मे २०२२ ला श्रद्धा आणि आफताब या दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर या दोघांचा आवाज वाढला त्यावेळी श्रद्धा जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी आफताबने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. हे भांडण का झालं होतं त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नव्हतं. जे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमुळे समोर आलं आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे आफताब पूनावालाने ३५ तुकडे केले होते. ते तुकडे तो महारौली येथील जंगलात फेकत होता.