नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याच्याविरोधातील खटला २४ फेब्रुवारीपासून सत्र न्यायालयात सुरू होणार आहे. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी या प्रकरणातील न्यायिक नोंदी सत्र न्यायालयात पाठवल्या आहेत.
पूनावाला याला आता शुक्रवारी साकेत येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांसमोर हजर राहावे लागणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार जघन्य गुन्ह्यांशी संबंधितप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हे प्रकरण महानगर दंडाधिकाऱ्यांमार्फत सत्र न्यायालयात पाठविले जाते.
पूनावाला याने न्यायदंडाधिकारी न्यायालयात सांगितले होते की, भविष्यातील कार्यवाहीदरम्यान मला धार्मिक पुस्तके, पेन आणि नोटपॅड बाळगण्याची परवानगी द्यावी. महादंडाधिकारी अविरल शुक्ला यांनी त्याला याबाबत न्यायालयात नवीन अर्ज दाखल करण्यात सांगितले आहे.
‘‘कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे.. आयपीसीचे कलम ३०२ केवळ सत्र न्यायालयाद्वारेच तपासण्यायोग्य आहे. त्यानुसार, आरोपींना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात यावे,’’ असे दंडाधिकारी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘‘हे प्रकरण आता सत्र न्यायालयात आहे.’’
आरोपपत्राची प्रत्यक्ष प्रत मिळाली आहे का, असे न्यायालयाने विचारले असता, पूनावाला याने होकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर त्याने आपले वकील एम एस खान यांना मदत करण्यासाठी धार्मिक मजकुराव्यतिरिक्त पेन, नोटपॅड आणि कायद्याची पुस्तके देण्याची विनंती केली.