पीटीआय, नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाने वकिलातर्फे मंगळवारी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा आपल्याकडून त्यावेळी अतीव संतापाच्या भरात झाला. त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी संपत होती. त्यामुळे आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांनी आफताबच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली. तसेच त्याच्या सत्यशोधन चाचणीला (लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट) परवानगी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आफताब पूनावालाकडून न्यायालयाला सांगितले गेले, की हा गुन्हा आपल्याकडून संतापाच्या भरात झाला. आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. आफताबच्या वकिलांनी सांगितले, की आफताबला हे शहर अपरिचित असल्याने त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केलेले अवयव नेमके कुठे फेकले, ती ठिकाणे ओळखण्यास त्याला अडचण येत आहे. आफताबला अवयवांचे अवशेष शोधण्यासाठी मेहरौली येथील जंगलातील एका तलावासह मैदानगढीत तलावापाशी नेण्यात येणार आहे. त्याने दिलेल्या वर्णनानुसार ज्या तलावात हे अवयवाचे तुकडे फेकले होते, त्या तलावाचे रेखाचित्र काढण्यात आले आहे. तपास सुरू असल्याने आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की आमच्या अर्जाच्या आधारे, आम्हाला आरोपीची आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ज्यामुळे अधिक पुरावे गोळा करण्यास मदत होईल. सत्यशोधन चाचणी करण्याची परवानगीही मिळाली आहे.

‘सीबीआय’ तपासाची मागणी फेटाळली

श्रद्धा वालकर हत्येचा तपास दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. ही जनहित नसून, ‘प्रसिद्धी हित याचिका’ (पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन) असे न्यायालयाने म्हंटले आहे. हा आदेश देताना न्यायालयाने किती दंड ठोठावला हे स्पष्ट केले नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा व न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळताना स्पष्ट केले, की निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही याचिका दाखल केली गेली. त्यासाठी कोणताही भक्कम आधार किंवा सबळ कारण दिलेले नाही. दिल्ली पोलिसांचे फौजदारी वकील संजय लाओ यांनी सांगितले, की या हत्या प्रकरणाचा ८० टक्के तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणी दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तपासात सहभागी आहे.

सुरुवातीला खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलाला या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्यामागचे कारण विचारले. हे प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपवण्यामागचे एखादे सयुक्तिक कारण सांगा. हत्या झालेल्या श्रद्धाच्या पालकांची या तपासाबाबत कोणतीही तक्रार नसताना तुमच्यासारख्या त्रयस्थांनी ही याचिका दाखल करण्यामागचे पटेल असे कारण सांगावे. याचिकाकर्त्यां जोशिनी तुली यांची बाजू मांडणारे वकील जोगिंदर तुली म्हणाले, की, प्रसारमाध्यमे व बघ्यांच्या गर्दीमुळे घटनास्थळांवरून पुरावे गोळा करताना, त्यात पुरावे नष्ट होण्याची जोखीम वाढली आहे. त्यावर खंडपीठाने स्पष्ट केले, की पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासावर लक्ष ठेवण्याचे काम न्यायालय करणार नाही. ही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल केलेली याचिका आहे. या प्रकरणाशी संबंध नसलेले तुम्ही त्रयस्थ आहात. पोलीस आपल्या पद्धतीने तपास करत आहेत. त्यावर न्यायालय लक्ष ठेवत नाही. आम्ही पोलिसांच्या तपासावर संशय का घ्यावा, असा सवालही खंडपीठाने विचारला.

श्रद्धाच्या तीन मैत्रिणींचे जबाब नोंदवले

वसई : श्रद्धा वालकर हत्या प्रकरम्णाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी मंगळवारी श्रद्धाच्या तीन मैत्रिणींचे जबाब नोंदवले. या प्रकरम्णात आतापर्यंत पोलिसांनी एकूण १९ जणांचे  जबाब नोंदवले आहेत. श्रद्धा वालकरच्या हत्येचा तपास करण्यासाठी वसईत आलेल्या दिल्ली पोलिसांनी या हत्येमागील घटनाक्रम तसेच पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी विविध लोकांचे जबाब नोंदविणे सुरू केले आहे. मंगळवारी पोलिसांनी श्रद्धाच्या तीन मैत्रिणींचे जबाब नोंदवले. या मुली श्रद्धाच्या महाविद्यालयीन मैत्रिणी आहेत. श्रद्धाचा स्वभाव, तिचे आफताबसोबत असलेले संबंध कसे होते याबद्दल पोलिसांनी जाणून घेतले. आफताब तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी श्रद्धा एकदम सरळमार्गी आणि चांगल्या स्वभावाची मुलगी होती असे या मैत्रिणीने पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी १९ जणांचे जबाब नोंदवले आहेत. दिल्ली पोलिसांचा वसईतील तपासाचा आजचा पाचवा दिवस होता.