गोवंश हत्याबंदीवरुन देशभरात वाद सुरु असतानाच आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर यांनीदेखील मासांहारासाठी पशूंच्या कत्तली सहन केल्या जाणार नाही, असे सांगत गोमांस सेवनाला विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी- विक्रीवर घातलेल्या निर्बंधाचे त्यांनी समर्थन केले.

मांसाहारासाठी जनावरांची उघडपणे कत्तली केल्या जात आहेत. यावर श्री श्री रविशंकर यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जनावरांची उघडपणे हत्या केली जात आहे. हे कदापिही सहन केले जाणार नाही. तसेच केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या गोवंश हत्याबंदीचे त्यांनी समर्थन केले.

जनावरांच्या हत्येवर बंदी आणण्याचे कारण गुरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण कोणी काय खावे, यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. तसेच यासाठी कोणताही नियमही नाही. गोहत्याबंदी ही केवळ भारतात नाही तर क्यूबा या देशातही लागू आहे. त्या देशातही गुरांच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे, असे ते म्हणाले. तामिळनाडू राज्यात यापूर्वी ८५ प्रकारचे गुरे होती. मात्र आता फक्त दोन प्रकारची गुरे आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, रविशंकर यांनी राम मंदिराच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, सर्वसामान्य लोकांच्या सहमतीने राम मंदिर उभारण्यात यावे.

यापूर्वी मालेगावातील भाजप उमेदवार शेख अख्तर यांनी गोमांसबंदी उठवण्यासंबंधी विधान केले होते. मात्र त्यांनी नंतर सारवासारव केली. मी गोमांसबंदी उठवण्यासंबंधी कोणतेही विधान केले नसून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.

Story img Loader