संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सलग दोन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा चालू आहे. आज याच मुद्य्यावर बोलताना डॉ.श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात तुफान खडाजंगी झाली. श्रीकांत शिंदेंनी आज संविधानावर सुरू केलेली चर्चा थेट महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यापर्यंत आणली. यावर मध्येच उठत राहुल गांधींनीही त्यांना रोखलं. पण श्रीकांत शिंदेंनी त्यांचं भाषण सुरूच ठेवले.
श्रीकांत शिंदे म्हणाले, “आज ऐतिहासिक दिवस आहे. संविधान हे समाजाचं आणि संसदेचं स्त्रोत आहे. राहुल गांधींनी आज संविधानाला सोडून त्यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळी राहुल गांधी अभय मुद्राची गोष्ट करत होते. आताही ते त्याच्याबाहेर आले नाहीत. अभय मुद्रा अहिंसा शिकवतात. पण हे १९८४ मध्ये नॉन स्टॉप हिंसाचार करण्याचं काम यांनी केलं”, असं म्हणत काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या अहिंसात्मक घटनांविषयी श्रीकांत शिंदेंनी माहिती दिली.
संविधानामुळे सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला
ते पुढे म्हणाले, राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात. हा अपमान उबाठा वाल्यांना मान्य आहे का? मी तुम्हाला तुमची आजीचं एक वाक्य सांगू इच्छितो.” स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे सचिव पंडित बाखले यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं होतं. या पत्राचं उत्तर देताना इंदिरा गांधींनी सावरकरांचं कौतुक केलं होतं. हे पत्रच आज श्रीकांत शिंदेंनी सभागृहात वाचून दाखवलं. ते पुढे म्हणाले,”मी विचारू इच्छितो की तुमची आजीही संविधानविरोधी आहे का? याच संविधानामुळे आम्ही इथे बसलो आहोत. हे श्रेय संविधनाचं आहे. याच संविधानाने साधारण परिवारातून येणाऱ्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले. तसंच, सामान्य रिक्षाचालकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले.” तसंच, त्यांचं भाषण सुरू असताना श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना दरडावलं. “महाराष्ट्रात महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेताही बनवता येऊ शत नाहीय”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा >> Rahul Gandhi on Savarkar: एका हातात संविधान, दुसऱ्या हातात मनुस्मृती आणि राहुल गांधी पुन्हा एकदा सावरकरांवर बोलले…
तेवढ्यात राहुल गांधी उठले आणि म्हणाले, “त्यांनी माझं नाव घेतलंय. मला त्यांना उत्तर द्यायचंय.” ते असं म्हणताच सभागृहात गोंधळ सुरू झाला. श्रीकांत शिंदेंनी त्यांचं म्हणणं पूर्ण करण्याची परवानगी मागितली. दरम्यान, विरोधकांनी सभागृहात बराच गोंधळ घातला. मोठ्या आवाजात घोषणाबाजी झाली. या घोषणाबाजीतच श्रीकांत शिंदेंनी त्यांचं भाषण सुरू ठेवलं.
दरम्यान, श्रीकांत शिंदेंच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जागेवरून उठत सभागृहात गोंधळ घातला. राहुल गांधींना बोलायची संधी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली. अखेर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही यात हस्तक्षेप केला. परंतु, विरोधक आपल्या मागणीवर अडून राहिले. अखेर, पिठासीन अधिकारी कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी मध्यस्ती करत राहुल गांधींना यांना बोलायची संधी दिली.
अखेर राहुल गांधींनी दिलं प्रत्युत्तर
राहुल गांधींनी तत्काळ उभं राहत श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नाला उत्तर दिलं. राहुल गांधी म्हणाले, “श्रीकांत शिंदेंनी मला विचारलं की इंदिरा गांधींचं सावरकरांबाबत काय भूमिका होती? मी लहान असताना इंदिरा गांधींना याबाबत विचारलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, सावरकरांनी ब्रिटिशांशी तडजोड केली होती. गांधीजी जेलमध्ये गेले, नेहरू जेलमध्ये गेले आणि सावरकरांनी माफी मागितली होती.”
दरम्यान, या उत्तरावरही समाधान न झाल्याने श्रीकांत शिंदेंनी पुन्हा इंदिरा गांधींच्या त्या पत्राचा दाखला देत सावरकरांविषयीची भूमिका स्पष्ट करायला सांगितली.