Shrikant Shinde On Waqf Amendment Bill: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज केंद्रिय अल्पसंख्यात मंत्री किरेन रिजेजू यांनी वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. यानंतर आता रात्री आठपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा होणार आहे. सध्या सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्ष या विधेयकाचे समर्थन करत आहेत. तर, विरोधकांकडून यावर टीका होत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या विधेयकाला विरोध केला आहे. मात्र एनडीएमध्ये असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे) याचे समर्थन केले आहे.
त्यामुळे वाईट वाटले
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यान ठाकरे गटाने याला विरोध केल्याने टीका केली आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, “शिवसेना आणि माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने, मी या विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा देतो. हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. आधी कलम ३७०, नंतर तिहेरी तलाक व सीएए आणि आता हे विधेयक गरिबांच्या कल्याणासाठी या सभागृहात आणले गेले आहे. त्यांचे (अरविंद सावंत, ठाकरे गट) भाषण ऐकून मला खूप वाईट वाटले. ते खूप धक्कादायक होते.”
बाळासाहेब आज जिवंत असते तर…
श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, “मी यूबीटीला एक प्रश्न विचारू इच्छितो, त्यांनी त्यांच्या आंतरआत्म्याला विचारावे की, जर बाळासाहेब आज जिवंत असते तर ते असे बोलले असते का? आज हे स्पष्ट झाले आहे की यूबीटी आज कोणाची विचारसरणी स्वीकारत आहे आणि या विधेयकाला विरोध करत आहे.”
विचारसरणी बुलडोझरने चिरडली
“त्यांच्याकडे त्यांच्या चुका सुधारण्याची, त्यांचा इतिहास पुन्हा लिहिण्याची आणि विचारसरणी जिवंत ठेवण्याची सुवर्णसंधी होती. पण यूबीटीने आधीच त्यांची विचारसरणी बुलडोझरने चिरडली आहे. जर बाळासाहेब आज येथे असते आणि यूबीटीची असहमती पत्रं वाचली असती तर त्यांना दुःख झाले असते.”
काय म्हणाले होते अरविंद सांवत?
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत हे श्रीकांत शिंदे यांच्या आधी वक्फ विधेयकावर बोलले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, “मी देखील वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा सदस्य होतो. दुर्दैवाने, शेवटपर्यंत प्रत्यक कलमावर चर्चा झाल्या नाहीत. तुम्ही या विधेयकाद्वारे कोणाशीही न्याय करू इच्छित नाही. तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे असे समजू नका. मला वाटते की, तुमचे लक्ष आता फक्त बिहार निवडणुकांकडे आहे.”