काश्मीरमधील रायझिंग काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणातील चौथ्या संशयिताला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या संशयिताचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला होता. या संशयिताने शुजात बुखारी यांच्या अंगरक्षकाची पिस्तुल काढून घेतली होती. ती सुद्धा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. त्याचा सुद्धा या हत्येत सहभाग असण्याची शक्यता आहे.
संशयिताला ताब्यात घेतले असून घटनास्थळावरुन चोरी झालेली पिस्तुल त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे तसेच काल त्याने जे कपडे घातले होते ते सुद्धा जमा केले आहेत. तपास सुरु असून हा दहशतवादाशी संबंधित गुन्हा आहे असे काश्मीरचे पोलीस अधिकारी एस.पी.पानी यांनी सांगितले.
काल संध्याकाळी श्रीनगर येथे पत्रकार शुजात बुखारी यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली. त्यांचे दोन सुरक्षारक्षकही या हल्ल्यात ठार झाले. सांयकाळच्या सुमारास श्रीनगरमधील प्रेस कॉलनीतील आपल्या कार्यालयातून बाहेर पडताना बुखारी व त्यांच्या सुरक्षारक्षकावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात बुखारी हे ठार झाले तर सुरक्षा रक्षकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
यापूर्वी बुखारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हापासून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. बुखारी यांची धाडसी पत्रकार म्हणून ओळख होती.मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून ईदच्या आधी दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला असल्याची टीका केली. त्यांनी बुखारी कुटुंबीयांचे सांत्वनही केले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.