केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी मुंबईच्या अंधेरी भागातील बीएजी चित्रपट प्रशिक्षण संस्थेसाठीचा भूखंड परत घेण्याची विनंती शासनाला केली आहे. राजीव शुक्ला बीएजी चित्रपट प्रशिक्षण संस्थेच्या सचिवपदावर कार्यरत आहेत. प्राथमिक शाळा आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असणारा हा भूखंड सन २००८ मध्ये संबधित संस्थेला शासनाकडून कवडीमोल भावात देण्यात आला होता. मोक्याच्या ठिकाणी असणारा भूखंड बाजारभावापेक्षा कमी दरात देण्यात आल्याने त्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले होते, त्यामुळे बीएजी संस्थेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून भूखंड परत घेण्याची विनंती केली. ही प्रक्रीया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिवांना देण्यात आले असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले. याबाबत बोलताना राजीव शुक्लांनी शिक्षण संस्थांना अशाप्रकारे भूखंड देण्यात येणे सामान्य असून, संबधित व्यवहारात कोणताही गैरप्रकार झाल्याचे अमान्य केले. मात्र, राजीव शुक्ला यांना भूखंड परत करण्याचे कोणतेही अधिकार नसून यासाठी महसूल विभागाकडून आवश्यक त्या प्रक्रीया पूर्ण न करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

Story img Loader