अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्यासाठी पैशांचा हट्ट धरल्याने पुन्हा एकदा रिपब्लिकन व डेमोक्रॅट नेत्यांमध्ये कोंडी निर्माण झाली असून नवीन वर्षांत अंशत शटडाऊन होण्याची भीती आहे. बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी ५ अब्ज डॉलर्सची मागणी ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसकडे केली असून त्यामुळे डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन पक्षात वाद झाले असून चार दिवसांत चार केंद्र सरकारी संस्थांचे काम आर्थिक तरतुदीअभावी बंद पडले आहे.
जर ख्रिसमसच्या सुटय़ा लागण्यापूर्वी या वादातून तोडगा निघाला नाही तर शटडाऊनचे आणखी फटके बसणार आहेत. जानेवारीच्या सुरुवातीपासून शटडाऊनचे प्रमाण वाढत जाणार आहे. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेसमध्ये डेमोक्रॅट्सचे प्राबल्य असणार आहे. अमेरिकी काँग्रेसच्या नेत्यांचा शटडाऊनला विरोध असून डेमोक्रॅटस सदस्यांनी ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्यास पाच अब्ज डॉलर्स देण्यास नकार दिला आहे. याच महिन्यात भिंत बांधण्याबाबत जे विधेयक मांडण्यात आले होते त्यात १.६ अब्ज डॉलर्सचा उल्लेख होता त्यामुळे ५ अब्ज एवढी रक्कम मिळणार नाही असे डेमोक्रॅटसचे म्हणणे आहे.
सोमवारी ट्रम्प यांनी विरोधकांवर चौफेर हल्ला करून असे सांगितले की, भिंतीशिवायही देशाची सुरक्षा होऊ शकते असेही डेमोक्रॅट सदस्य म्हणतील पण ते त्यांच्या पक्षाची भूमिका पार पाडत आहेत एवढाच त्याचा मर्यादित अर्थ आहे. व्हाइट हाउसचे सल्लागार स्टीफन मिलर यांनी सांगितले की, काहीही झाले तरी स्थलांतरितांची डोकेदुखी संपवण्यासाठी सीमेवर भिंत आवश्यक आहे.