सियाचिन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनामुळे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या दहा भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. कालपासून या जवानांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू असले तरी हे जवान जिवंत असण्याची शक्यता फारच कमी असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून काही वेळापूर्वीच सांगण्यात आले होते. अखेर या दुर्देवी बातमीवर भारतीय लष्कराकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. ही दुख:द घटना असून आम्ही सर्व आव्हानांवर मात करून देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना सलाम करतो, अशी प्रतिक्रिया लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा यांनी व्यक्त केली.

सियाचिन ग्लेशियरमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या हिमस्खलनामुळे १९ मद्रास बटालियनचे दहा जवान ढिगाऱ्याखाली सापडले होते. या जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि हवाई दल यांच्याकडून संयुक्तपणे शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या भागामध्ये हिमस्खलनाच्या घटना सातत्याने घडत असतात. गेल्याच महिन्यात हिमस्खलन झाल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता. समुद्रसपाटीपासून १९६०० फूट उंचीवर सियाचिन ग्लेशियरमध्ये गस्त घालण्याचे काम लष्कराच्या जवानांकडून करण्यात येते. अत्यंत विषम नैसर्गिक परिस्थितीत जवान या ठिकाणी कार्यरत असतात. हिवाळ्यामध्ये येथील किमान तापमान उणे ६० अंश सेल्सियसपर्यंत खाली येते.

Story img Loader