सियाचीन ग्लेशियरमधील हिमस्खलनात आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या हनुमंतप्पा यांचा जीव बर्फातील हवेच्या पोकळीमुळे वाचल्याची माहिती समोर आली आहे. हिमस्खलन झाल्यानंतर हनुमंतप्पा बर्फात ३५ फूट खोलवर तयार झालेल्या हवेच्या या पोकळीत सापडले. याच पोकळीतून त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होत राहिल्यामुळे ते जिवंत राहू शकले.  एका अधिकाऱ्याने सांगितले की , ज्या भागात हनुमंत दबला गेला तिथे एक हवेची पोकळी (एअर बबल) तयार झाला होता. त्यातूनच त्याला ऑक्सिजन मिळत होता. त्यावर तंबूचा एक तुकडाही उडून आला होता. त्यामुळे बर्फाशी त्याचा थेट संपर्कही झाला नव्हता. बर्फातून बाहेर काढल्यानंतर हनुमंतप्पाची प्रकृती चिंताजनक होती. मंगळवारी सकाळी डॉक्टराच्या पथकाने त्याला सियाचीन बेस कँपवर नेले. त्यानंतर थॉईस विमानतळावरून हनुमंतप्पांना विशेष विमानाने थेट दिल्लीत आणण्यात आले. सध्या लष्करी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३ फेब्रुवारी रोजी हिमस्खलनात दहा जवान गाडले गेल्यानंतर भारतीय सैन्याकडून लगेचच शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. या शोध मोहिमेत लष्काराचे १५०-२०० जवान सहभागी असून त्यामध्ये बचाव पथक, दोन श्वान (स्निफर डॉग)  डॉक्टर्स, सियाचिन बॅटल स्कूलचे इस्ट्रक्टर्स, १९ मद्रास रेजिमेंटचे जवान आणि लडाख स्काऊटच्या जवानांचा समावेश होता.
लष्कराच्या शोधपथकांना रडारच्या सहाय्याने हनुमंतप्पा यांचा शोध लागला. मात्र, ते जिवंत सापडण्याची आशा फारच कमी होती. हनुमंतप्पा बर्फात गाडल्या गेलेल्या ठिकाणी एक श्वान वारंवार घुटमळत होता. सोमवारी पथकाने येथे खोदकाम सुरू केले. त्यात लान्सनायक हनुमंतप्पा जिवंत आढळले. बाहेर काढले तेव्हा ते शुद्धीवर होते. मात्र, ते खूप  अशक्त झाले होते. त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. याशिवाय गोठवणाऱ्या थंडीमुळे हायपोथर्मिया झाला होता. हनुमंतप्पाला तत्काळ ऑक्सिजन देण्यात आला आणि त्यांना उबदार तंबूत ठेवण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siachen miracle 25 feet air pocket kept lance naik hanumanthappa alive