Two Siblings Live with Their Mother’s Body for 10 Days : तेलंगणातील सिकंदराबाद येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. वारसीगुडा येथील दोन मुलींना आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या मृत आईचा मृतदेह सुमारे दहा दिवस घरीच ठेवावा लागला. यानंतर स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी महिलेचा मृतदेह रुग्णालयात हलवला. मृत महिलेचे नाव सी. ललिता असे आहे. ललिता गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या.

मृत ललिता यांना दोन मुली असून, रवलिका (२५) साडीच्या दुकानात काम करते आणि अश्विता (२२) इव्हेंट प्लॅनर आहे. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने दोघींकडेही त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराचा खर्च करण्यासाठी पैसे नव्हते. दोन खोल्यांच्या घरात या मुली आणि त्यांची आई राहायची. दरम्यान अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने दोन्ही बहिणींनी त्यांच्या आईचा मृतदेह एका खोलीत ठेवला आणि त्या दुसऱ्या खोलीत राहत होत्या.

दरम्यान मृत ललिता या घरीच असायच्या, तर रावली एका कपड्यांच्या दुकानात आणि यशविथा एका इव्हेंट मॅनेजिंग एजन्सीत काम करायची, पण दोन महिन्यांपूर्वी त्यांनी काम करणे थांबवले होते, असे एका पोलिसांनी सांगितले. या मुलींना काम का थांबवले होते याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

दुर्गंधीमुळे समोर आले प्रकरण

दरम्यान शेजाऱ्यांना या मुलींच्या घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शंका आली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर घरात मृतदेह असल्याची घटना उघड झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गांधी रुग्णालयात पाठवला.

मदत नाकारल्याने मुली अस्वस्थ

दरम्यान ही घटना उघडकीस येण्यापूर्वी, अस्वस्थ मुलींनी त्यांच्या आईचे अंतिम संस्कार करण्यासाठी सीताफळमंडी येथील एका बहुउद्देशीय संस्थेकडे मतद मागितल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर या मुलींनी आईच्या अंत्यसंस्कारासाठी अंबरपेटमध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकाशी मदतीसाठी संपर्क साधला होता, परंतु त्यांच्याकडूनही काही मदत झाली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता त्यांचे पती सीएल राजूपा यांच्यापासून सुमारे पाच वर्षांपूर्वी विभक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्या दोन मुलींसह उस्मानिया विद्यापीठाजवळील माणिकेश्वरी नगर येथे राहत होती आणि तीन महिन्यांपूर्वी वारसीगुडा येथील बौद्ध नगर येथे दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहायला आल्या होत्या.

Story img Loader