विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेतले नाहीत. परंतु, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील यावर अनेक पक्षांचं एकमत झालं आहे. या निर्णयावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला त्यांच्याच राज्यातून म्हणजेच कर्नाटकातून विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून राहुल गांधींचा उल्लेख केला आहे. सिद्धरामय्या म्हणाले, इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकेल, त्यानंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री व्हावं.
सिद्धरामय्या म्हणाले, केवळ काँग्रेस पक्षच देशातल्या समस्या सोडवू शकतो. काँग्रेसमध्येच ती क्षमता आहे. त्यासाठी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत. काँग्रेसच्या १३९ व्या वर्धापन दिनानिमित्त बंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत कुठल्याही नेत्याने आपल्या देशात भारत जोडो यात्रेसारखं काही केलेलं मी पाहिलं नाही. आता राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा पुढचा टप्पा ‘भारत न्याय यात्रा’ काढणार आहेत. देशातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असेल.
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल. प्रत्येक औषधाची जशी एक्सपायरी डेट (वैधता) असते, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचं औषध लवकरच एक्सपायर होईल. येत्या काळात मोदी औषध परिणामकारक ठरणार नाही.
हे ही वाचा >> “हिंदुत्व, हिंदुत्व आहे, मी हिंदू आहे आणि आम्हीही रामाची पूजा.. “, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं वक्तव्य
इंडिया आघाडीची १९ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. आघाडीतल्या अनेक पक्षांनी त्यास पाठिंबा दर्शवला आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यातूनच मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे आलं. द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला पाठिंबा दर्शवला. यासह आघाडीतल्या २८ घटक पक्षांपैकी १६ हून अधिक पक्षांनी खरगेंना पाठिंबा दिला असून यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.