आमदारांनी बहुमताने निवडलेले सिद्दरामय्या हे सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बंगळुरूतील कांतीवीरा स्टेडियमवर होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल एच. आर. भारद्वाज हे सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सिद्दरामय्या मंत्रीमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
एस.सिद्दरामय्या यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सिद्दरामय्या यांचा शपथविधी सोमवारी होणार असून परंपरेप्रमाणे राज भवनच्या ‘ग्लास हाऊस’ ऐवजी हा शपथविधी श्री कांतीरवा स्टेडियमवर सोमवारी सकाळी ११.५० वाजता होईल.
‘ग्लास हाऊस’ मधील शपथविधीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक लोकांना त्या कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते. नेमकी हीच बाब टाळण्यासाठी आणि हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा म्हणून शपथविधीसाठी श्रीकांतीरवा स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. भाजपचे दक्षिणेतील प्रवेशद्वार ठरलेल्या कर्नाटकातली सत्ता खेचून आणल्याने हा विजय लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठीही सार्वजनिक ठिकाणी शपथविधी सोहळ्याची योजना काँग्रेसने जाणीवपूर्वक केली आहे.
मंत्रिमंडळात कोणाला समाविष्ट करून घ्यायचे यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असे सिद्दरामय्या, प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर तसेच राज्य शाखेचे सचिव मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.
सिद्दरामय्या यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर चाहते आणि हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती.
तत्पूर्वी सिद्दरामय्या यांनी जी. परमेश्वर यांची जातीने भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, असे सिद्दरामय्या यांनी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत परमेश्वर हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून ओळखले जात असताना त्यांचा पराभव धक्कादायक मानला जातो. पक्षातीलच काही विरोधी गटांनी कट-कारस्थान करून त्यांचा पराभव घडवून आणला, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
असे असले तरी परमेश्वर यांच्याबाबत दिल्लीत मोठे समर्थन असल्याने त्यांना मंत्रीपद दिले जाईल आणि नंतर विधान परिषदेवर निवडून आणले जाईल, अशी चर्चा आहे. मंत्रीमंडळात स्थान मिळावे म्हणून ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार, आर. व्ही. देशपांडे, एस. शिकंकराप्पा आणि टी. बी. जयचंद्र हे आमदार जोरदार हालचाली करीत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सिद्दरामय्या यांचे शनिवारी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी सिद्दरामय्या यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात अनेक नेते गुंतलेल्या काँग्रेसला कर्नाटकच्या विजयाने दिलासा मिळाला आहे. या विजयाचा वापर २०१४ च्या निवडणुकीसाठी करून घेण्याचाही पक्षाचा प्रय्तन आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा