प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे काही जवळचे मित्र आणि राजकारणी यांचा हात असल्याचा आरोप बलकर सिंग यांनी केला आहे. बलकर सिंग सिद्धू मुसेवालांचे वडील आहेत. या लोकांची नावं लवकरच जगापुढे जाहीर करणार असल्याचं सिंग यांनी सांगितलं आहे.
“सिद्धू कमी वेळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्याने काही जणांना सहन झाले नाही. यामुळेच त्यांनी त्याची हत्या केली. या प्रकरणात सरकारचीही दिशाभूल करण्यात आली” असा आरोप बलकर सिंग यांनी केला आहे. काही लोकांची इच्छा होती की सिद्धूने त्याच्या कारकीर्दीतील सर्व व्यवहार त्यांच्यामार्फत करावेत. मात्र, सिद्धू हा स्वतंत्र होता. हेच त्यांना मान्य नसल्यानं त्यांनी त्याला संपवल्याचं बलकर सिंग म्हणाले.
२९ मे २०२२ रोजी पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात सिद्धू मुसेवालांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धूवर एकाचवेळी तब्बल ३० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटातच घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला.
सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसह प्रवास करत असताना जवाहरके गावात हा हल्ला करण्यात आला होता. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असताना सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.
Delhi Crime 2 Trailer : ॲक्शन, ड्रामा अन् सस्पेन्स, बहुचर्चित दिल्ली क्राइम २ चा ट्रेलर प्रदर्शित
राज्य सरकारने केलेल्या सुरक्षा कपातीनंतर दुसऱ्याच दिवशी सिद्धूवर प्राणघातक हल्ला झाला होता. राज्य सरकारकडून त्यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. या सुरक्षेमध्ये कपात करून नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षकच त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले होते. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही होती. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी ते सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने प्रवास करत होते.