आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पक्ष प्रवेशावर भाष्य केले आहे. आपमध्ये प्रवेश करण्यासाठी सिद्धू यांनी कुठल्याच अटी पक्षासमोर ठेवल्या नसून त्यांना याबाबत विचार करण्यासाठी वेळ देण्याची गरज असल्याचे मत केजरीवाल यांनी शुक्रवारी ट्विटरवर व्यक्त केले आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपच्या राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग केला असला तरी त्यांनी अजून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. आपने आगामी निवडणुकीत आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची तसेच आपल्या पत्नीलाही विधानसभेचे तिकिट देण्याची अट सिद्धू यांनी ठेवल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते. यावर केजरीवाल यांनी अजून भाष्य केले नव्हते. केजरीवाल यांनी मागील आठवडयात सिद्धू यांची भेट घेतली होती. सिद्धू हा महान क्रिकेटपटू असून त्याचा मान राखला पाहिजे असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपने आपल्याला पंजाबमधील राजकारणापासून दूर राहण्यास सांगितले होते. मला ते मान्य नसल्याने आपण खासदारकीचा राजीनामा दिल्याचे सिद्धू यांनी माध्यमांना सांगितले होते. अकाली दलाच्या नेतृत्वावरही त्यांनी टीका केली होती. सिद्धू यांनी आपल्या पत्नीलाही उमेदवारीची मागणी केली असली तरी आपच्या घटनेप्रमाणे एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी देता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
आपने १९ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केलेली असली तर अजून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अजून घोषित केलेला नाही. संगरूरचे खासदार व प्रचार समितीचे अध्यक्ष भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. परंतु सिद्धू यांच्या आपमधील प्रवेशामुळे पक्षातंर्गत राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा