प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ मध्ये भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मुख्य संशयित गोल्डी ब्रार होता, अशी माहिती त्यानंतर समोर आली होती. आता याच गोल्डी ब्रारची अमेरिकेत भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गँगस्टर गोल्डी ब्रारचा मृत्यू झाला आहे. मात्र, या बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
गोल्डी ब्रार याला अमेरिकेमधील फेअरमॉन्ट आणि हॉल्ट एव्हेन्यू येथे गोळ्या घालण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे. या घटनेची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. एका अमेरिकन वृत्तवाहिनीने या गोल्डी ब्रारची हत्या झाल्याचा दावा केला असल्याची माहिती सांगितली जात आहे. गोल्डी ब्रारच्या हत्येची जबाबदारी अमेरिकेतील डल्ला लखबीरने घेतली आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तवाहिनीच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.
सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणानंतर गोल्डी ब्रारला भारत सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. गोल्डी ब्रारचे प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसाशी संबंध असल्याचं भारत सरकारने म्हटले होते. तसेच दहशतवादी संघटनांचा गोल्डीला पाठिंबा असून अनेक हत्यांशी गोल्डी ब्रारचा संबंध, अनेकांना धमकी देणं, खंडणी मागणं, अनेक हत्या, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची तस्करी, असे अनेक आरोप त्याच्यावर असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले होते. गृहमंत्रालयाने गोल्डी ब्रारबाबत काही दिवसांपूर्वी एक पत्रकही जाहीर केले होते.
दरम्यान, गोल्डी ब्रारने कॅनडात बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट आखला होता. सिद्धू मुसेवालाची गोळ्या ३० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवालाच्या हत्येनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून गोल्डी ब्रारने मुसेवालांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.