देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत खाली आली आहे. संख्येत जवळपास ३० टक्के घट झाल्याने आता देशातील करोनाची प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी झाली आहेत. मात्र देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांमध्ये करोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. या राज्यांमधील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना विषाणूच्या संसर्गाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये करोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे दिसत आहेत. करोनामुळे शरीरात रक्त गोठते. तसेच आणखी एक कारण म्हणजे लसीकरणानंतर पडून राहल्यामुळे रक्त गोठते. त्यासाठी आम्ही ब्लड थिनर देतो. आता सर्वसामान्यांनाही साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढे यावे लागेल. गर्दीत सामुदायिक जबाबदारी पार पाडावी लागेल.”

पुढच्या महिन्यात करोनाची तिसरी लाट?; SBI च्या अहवालामुळे धास्ती वाढली

लव अग्रवाल म्हणाले, हिलस्टेशन्सवर जाणारे लोक कोविड-प्रोटोकॉलचे अनुसरण करीत नाहीत. त्यांनी शासकीय मार्गदर्शक तत्वांचा योग्य प्रकारे पालन करावे, अन्यथा आम्ही पुन्हा निर्बंध लागू करु. आपण शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास महामारी पुन्हा एक भयानक प्रकार येऊ शकते.

तीन महिन्यांनंतर करोना रुग्णसंख्येत मोठी घट

देशात थैमान घालणाऱ्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची मगरमिठी आता सैल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाचा वेग कमी झाला असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी दिलासा देणारी आहे. १११ दिवसांनंतर म्हणजे जवळपास तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं आहे. देशातील रिकव्हरी रेट ९७.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशात ३४ हजार ७०३ नवीन रुग्ण आढळून आले असून, ही मागील १११ दिवसांतील निचांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांबरोबरच सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या निचांकी रुग्णसंख्येबरोबरच देशातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्याही घटली आहे. देशात ४ लाख ६४ हजार ३५७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

तिसऱ्या लाटेची भीती… लसीकरणाला वेग

डेल्टा प्लस या विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, हा विषाणू तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत (५ जुलैपर्यंत) भारतात एकूण ३५,७१,०५,४६१ लशीचे डोस देण्यात आले आहेत, ज्यात पहिल्या आणि दुसर्‍या डोसचा समावेश आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३१.४४ लाखांपेक्षा जास्त लशीचे डोस दिले गेले आहेत.