सरबत खालसाचा निर्णय
शीख संस्थांना राजकीय प्रभावाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सरबत खालसाची बैठक अमृतसर येथे सुरू झाली असून त्यामुळे शिरोमणी अकाली दल पुरस्कृत पंजाब सरकारला डोकेदुखी झाली आहे. या बैठकीत कट्टर शीख गटांचा समावेश आहे. सरबत खालसाची पूर्वीची बैठक १९८६ मध्ये झाली होती. तथापि शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समिती व अकाल तख्त यांनी या सरबत खालसाला मान्यता नाकारली आहे. दरम्यान या बैठकीत शीख कट्टरपंथीयांनी धर्मप्रमुख पदावरून तिघांची हकालपट्टी केली असून पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग यांच्या खून प्रकरणातील आरोपी जगतार सिंग हावरा यांना अकाल तख्तचे प्रमुख नेमले आहे, गुरूबचन सिंग यांना काढून टाकण्यात आले. दमदमी टाकसाळचे अमरिक सिंग अजनाला व संयुक्त अकाली दलाचे बलजित सिंग दादुवाल यांना तख्त केशगड साहिब व तख्त दमदमा साहिबचे प्रमुख नेमले आहे.
अमृतसर तरणतारण रस्त्यावरील भाई नौध सिंग यांच्या समाधीस्थळी ही बैठक होत असून पिकांचे नुकसान, गुरू ग्रंथसाहिबाची विटंबना, त्यानंतरची निदर्शने यामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्य सरकारला आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. पोलिस आयुक्त जे.एस. औलाख यांनी सांगितले की, निमलष्करी दले, पोलिस जवान, जलद कृती दलाचे जवान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पंचप्याऱ्यांनी सरबत खालसाला पाठिंबा दिला आहे. पंचप्यारे हे पाच शीख धर्मशिक्षक असतात व गेल्या महिन्यात त्यांनी शीख धर्मगुरूंना अकाल तख्तपुढे बोलावून सिरसा डेराचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांची माफी मागितल्याबाबत बोलावले होते. आताच्या सरबत खालसाच्या बैठकीत अकाल तख्तचे प्रमुख गुरूबचन सिंग व इतर धर्मगुरूंना डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंग यांना २००७ मधील खून व ईश्वरनिंदा प्रकरण व त्यानंतरच्या दंगली प्रकरणात माफ केल्याच्या प्रकरणी काढून टाकण्याबाबत विचार केला जाणार असल्याचा आधीच अंदाज होता.
सरबत खालसाच्या बैठकीसाठी परदेशातूनही शीख धर्मिय आले आहेत, असे शिरोमणी अकाली दल (अमृतसर) शाखेचे सीमरणजित सिंग मान यांनी सांगितले.